ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांकडून ठिकठिकाणी निकृष्ट मोबाईल स्विकारण्या अधिकाऱ्यांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 05:44 PM2021-08-23T17:44:39+5:302021-08-23T17:45:42+5:30
निकृष्ट दर्जाचे मोबाईल शासनाला परत करण्यासाठी ठाणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणच्या प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी सेविकांना गेल्या सोमवारी गेल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : निकृष्ट दर्जाचे मोबाईल शासनाला परत करण्यासाठी ठाणे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणच्या प्रकल्प कार्यालयात अंगणवाडी सेविकांना गेल्या सोमवारी गेल्या होत्या. पण त्यांना अडवून त्यांचे मोबाईल स्विकारण्यास अंबरनाथसह अन्य ठिकाणच्या अधिकार्यांनी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या सेविका व अधिकार्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले.
अंगणवडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे व कमी क्षमतेचे आहे. या मोबाईल २ जीबी रमचा आणि त्यात क्षमतेपेक्षा जास्त लाभार्थांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप आदींची नोंद ठेवावी लागत आहे. पण कमी क्षमतेचे हे मोबाईल आता हँग होत आहे. याशिवाय मोबाईल लवकर गरम होतो. त्यामुळे या मोबाईलवर काम करणे कठिण झाले आहे. त्यामुळे राज्यात १७ आँगस्टपासून हे मोबाईल शासनाला परत केले जात आहे. आज ठाणे शहरातील माजीवाडा, बाळकूम, राबोडी, नळपाडा, गांधीनगर आदींसह शहापूर, डोळखांब, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथला अंगणवाडी सेविकांनी मोबाईल सुपूर्द केले.
अंबरनाथसह काही ठिकाणी सेविकांची आडवणूक झाली. मोबाईल स्विकारुन त्यांची पोहोच देण्यास अधिकार्यांनी नकार दिला. त्यामुळे सेविकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान ठिकाणी अधिकार्यांशी शाब्दिक चकमकी उडाल्या. आज जिल्ह्यातील सेविकांनी तीन हजार मोबाईल शासनाला परत करण्याचा निर्धार केला होता. सेविकांना दिलेला मोबईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून तो आता जुना झाला आहे. तो सतत नादुरूस्त होतो. त्याच्या दुरुस्तीसाठी लागणारी रक्कम सुमारे तीन ते आठ हजार रुपये अंगणवाडी सेविकांकडून वसूल केली जात असल्याचा आरोप या सेविकांकडून होत आहे. आता नुकतेच एक लाख मोबाइल मंगळवारी शासनाला परत केले आहेत. आता जिल्ह्यातील तीन हजार पेक्षा जास्त मोबाईल सोमवारी एकाच दिवशी जमा करण्याचा प्रयत्न सेविकांनी केला.
सध्या सर्व मोबाईल बंद पडलेले आहेत.केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अप दिले आहे. शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये रॅम कमी पडत असल्यामुळे हे अँप डाउनलोड होत नाही. राजभाषा मराठी असताना इंग्रजीत अँपमध्ये माहिती भरण्याची जबरदस्ती करणे हे बेकायदेशीर असल्याचे ही सेविकांकडून ऐकवलं जात आहे. या सेविकांचे राज्यस्तरीय नेतृत्व राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य अध्यक्ष अँड. एम. ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, दिलीप उटाणे, शुभा शमीम, भगवान देशमुख, कमल परुळेकर, जयश्री पाटील आदी पदाधिकारी करीत आहेत.