अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचे सूत्रधार पोलिसांच्या रडारवर, २६ सिम बॉक्स मशिन्स हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:42 PM2017-10-22T22:42:01+5:302017-10-22T22:42:45+5:30
भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात वसीम शेख, शाह आलम आणि कबीर हे तिघे जण गुन्हे अन्वेषण विभागाच्या रडारवर आहेत.
- जितेंद्र कालेकर
ठाणे- भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात वसीम शेख, शाह आलम आणि कबीर हे तिघे जण गुन्हे अन्वेषण विभागाच्या रडारवर आहेत. वसीम हा आंतरराष्ट्रीय कॉलसाठी १४ ते १६ पैसे प्रति मिनिटप्रमाणे कॉलची विक्री करायचा. यातूनच एका गेटवे (सिम बॉक्स मशिन) मधून महिना ६० ते ७० हजार रुपयांची कमाई केली जायची. अशा २६ मशिन्स गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने हस्तगत केल्या आहेत.
भिवंडी परिसरात अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरू करून परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल हे अनधिकृत सीम बॉक्सचा वापर करून, त्यामध्ये भारतीय कंपनीच्या सिम कार्डस्चा वापर करून भारतातील इच्छित मोबाइल क्रमांकावर कॉल केले जात होते. ही माहिती मिळाल्यानंतर भिवंडी युनिटचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आणि संदीप निगडे यांच्या पथकाने १० आॅक्टोबरच्या पहाटे १५ ठिकाणी धाडी टाकून दहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून आतापर्यंत २६ सिम बॉक्ससह सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेतील टोळीकडून पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे, निरीक्षक शीतल राऊत आदी अधिकाºयांनी गेल्या १२ दिवसांमध्ये कसून चौकशी केली.
मनोजकुमार एटीएसकडून जेरबंद
भिवंडी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजशी संबंधित असलेल्या मनोजकुमार सैनी याची माहिती अटकेतील आरोपींकडून मिळाल्यानंतर भिवंडी युनिटचे अधिकारी राजस्थानमध्ये गेले होते. मात्र, तत्पूर्वीच १३ आॅक्टोबरला राजस्थान दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याला अटक केल्याची माहिती या पथकाला मिळाली. वसीमने नवलगड (राजस्थान) येथे मनोजकुमारकडे सिम बॉक्सची विक्री केली होती. वसीममार्फतच राजस्थान आणि भिवंडीतही हे टेलिफोन एक्सचेंज चालविले जात होते.
दिवसाला ४ हजार रुपये कमिशन
वसीम आणि त्याची टोळी भिवंडीतील वेगवेगळया अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजला गेटवे मशिन्स पुरावित होते. त्यातून एका कॉलिंगला प्रतिमिनिट १४ ते १६ पैसे असे दिवसाला सुमारे चार हजार रुपये कमिशन त्याला मिळत होते. साधारण, एका सिम बॉक्स मशिनमागे किमान ७० ते ७५ हजार रुपये प्रतिमहिना त्याची कमाई होत होती. अशा २६ मशिन्स आतापर्यत पोलिसांनी जप्त केल्या आहेत. म्हणजे ही कमाई निव्वळ १८ ते २० लाखांमध्ये जात होती. त्यातून आंतरराष्ट्रीय कॉल्स प्रथमदर्शनी दिसत नसल्यामुळे केंद्राचा करोडो रुपयांचा महसूल यातून बुडत होता. शिवाय, खंडणी किंवा देशविघातक कृत्यांसाठीही या राऊटर्सचा (कॉल वळविणे) वापर होत असल्याची शक्यता आहे. त्यातील अंबरनाथच्या एका प्रकरणात खंडणीसाठी कॉल गेल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
अंबरनाथच्या एका व्यापा-याला खंडणीसाठी कॉल येत होते. हे कॉल ओडीसातून येत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यानुसार उल्हासनगर पोलीस ओडीसाला गेले. हा कॉल आंतरराष्ट्रीय असून तो भिवंडीच्याच अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजमधून राऊट केल्याची माहिती समोर आली. त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी भंडाफोड केला.
राऊटर कॉलचा उपयोग कोणासाठी
अधिकृत टेलिफोन एक्सचेंजद्वारे आंतरराष्ट्रीय फोन केल्यानंतर त्याचा प्रतिमिनिट आठ ते नऊ रुपये प्रमाणे दर आकारला जातो. भारतातून सौदी अरेबिया, अमेरिका, दुबई या देशांमध्ये नोकरी व्यावसायानिमित्त जे लोक बाहेर गेले आहेत, त्यांना फ्री कॉलींगच्या नावाखाली अशा राउटर कॉलचे कार्डस महिना ३०० ते ४०० रुपयांना विकले जातात. याच कार्डच्या आधारे हे अनिवासी भारतीय नागरिक भारतात फोन करून स्वस्तात फोन करण्यासाठी त्याचा वापर करतात. यातून सरकारचेही उत्पन्न बुडते आणि असे अनधिकृत एक्सचेंज चालविणा-यांकडेही रग्गड पैसा जमा होतो. त्यातूनच देशविघातक कारवायांसाठी देखिल अशाच एक्सचेंजचा वापर केला जाण्याची भीती वर्तविली जात आहे.
एका बॉक्समध्ये ३२ कार्डस
एका गेटवे (सिम बॉक्स मशिन) मध्ये ३२ सिम कार्ड बसविली जातात. एखाद्याने फोन केल्यानंतर तो प्रथम या गेटवेमध्ये येतो. त्यानंतर तो गेटवेतील सिममधून संबंधितांच्या फोनला जोडला जातो. मुळत: आंतरराष्ट्रीय असलेला हा कॉल गेटवेमुळे स्थानिक कॉलमध्ये रुपांतरीत होतो. एक्सचेंज चालविणारा इंटरनेटचे वर्षाला केवळ दोन ते तीन हजार रुपये मोजतो. तर एका सिम कार्डमागे ७०० ते ८०० रुपयांचा खर्च करतो. त्यातून मात्र लाखो रुपयांची ‘मलई’ या एक्सचेंजमधून ही टोळी उकळत होती, असेही आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. यात वसीम शेखसह आठ जणांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला दिली.