अरे हे काय! वाहतूक कोंडी होताच शाळेला सुट्टी; मनसे आमदाराचा चढला पारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 01:05 PM2024-08-29T13:05:12+5:302024-08-29T13:08:54+5:30
Raju Patil MNS: वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, या कारणामुळे चक्क शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली.
Raju Patil News: वाहतूक कोंडीची समस्या किती गंभीर होत चाललीये, याची प्रचिती देणारा प्रकार कल्याणमध्ये घडला. या प्रकारानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाचे याकडे लक्ष वेधत संताप व्यक्त केला. 'आमच्या कल्याण डोंबिवलीकरांवर कोणती मेडिकल ईमरजन्सी आली तर त्या नातेवाईकांना करायचं काय?', असा संतप्त सवाल आमदार राजू पाटील यांनी केला.
रस्तेमय खड्ड्यांबरोबरच आता वाहतूक कोंडींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर वाहनांच्या वाढलेल्या संख्येने यात भर टाकली आहे. वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांना सतत मनस्ताप सहन करावा लागत असताना आता चक्क शाळेच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे.
वाहतूक कोंडीवरून राजू पाटील इतके का संतापले?
आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठवलेला मेसेज पोस्ट केला आहे. वाहतूक कोंडी झाल्याने शाळेची बस अडकली आहे. त्यामुळे अचानक शाळेला सुट्टी देण्यात आली आहे, असा मेसेज शाळेने पालकांना पाठवला आहे.
यावरून आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. "प्रशासन बहिरं झालंय हे माहिती होतं पण आता आंधळंही झालंय वाटतं. कारण नागरिकांच्या समस्या दिसतचं नाही आहेत. वारंवार निदर्शनास आणून सुद्धा मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या ट्रॅफिकच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचा मात्र आजही कानाडोळा आहे. हे आजचंचं घ्या, ट्रॅफिक समस्या एवढी वाढलेय की शाळेच्या मुलांना सुट्टी जाहीर करावी लागली. हे असच सुरु राहिलं तर आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य ट्रॅफिकमध्येचं जाणारं वाटतं", असा सवाल राजू पाटलांनी केला आहे.
प्रशासन बहिरं झालंय हे माहिती होतं पण आता आंधळंही झालंय वाटतं. कारण नागरिकांच्या समस्या दिसतचं नाही आहेत. वारंवार निदर्शनास आणून सुद्धा मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या ट्रॅफिकच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचा मात्र आजही कानाडोळा आहे. हे आजचंचं घ्या, ट्रॅफिक समस्या एवढी वाढलेय की… pic.twitter.com/go0dEQCvMB
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 28, 2024
मनसे आमदाराचा महायुतीच्या मंत्र्यांना टोला
राजू पाटलांनी मंत्र्यांना सहन न कराव्या लागणाऱ्या वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरही बोट ठेवले. "उद्या जर आमच्या कल्याण डोंबिवलीकरांवर कोणती मेडिकल ईमरजन्सी आली तर त्या नातेवाईकांना करायचं काय? हाच जर मंत्र्याच्या रहदारीचा रस्ता असता तर बहुतेक ट्रॅफिकची समस्या झाली नसती. पण ही काय सर्वसमान्य जनता आहे. जनतेला गृहीत धरणं थांबवा आता", असे आमदार राजू पाटील म्हणाले आहेत.