तेलाला पुन्हा महागाईचा तडका, नारळ, पालेभाज्यांचेही दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 12:41 AM2021-01-04T00:41:04+5:302021-01-04T00:43:01+5:30
उन्हाळी पावट्याने खाल्ला भाव; द्राक्ष महाग, बीट स्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दिवाळीपासून तेलाच्या दरांत वाढ होत आहे. तेलाला अद्याप महागाईचा तडका आहे तर ओल्या नारळाने अर्धेशतक गाठले आहे. पालेभाज्या महागल्या असून उन्हाळी पावट्याने दरांत उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे बीट, टोमॅटो स्वस्त झाले आहेत. द्राक्षे अद्याप महाग असली तरी स्ट्रॉबेरी मात्र स्वस्त झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत भाज्या प्रचंड स्वस्त झाल्या होत्या. आता दरांत हळूहळू वाढ होत चालली आहे.
उन्हाळी पावटा, गवार, शेवग्याच्या शेंगा, राजमा या भाज्या महागल्या आहेत. पालेभाज्यांमध्येही वाढ झाली आहे.
या उलट बीट, टोमॅटो, मका स्वस्त झाले आहेत, असे भाजी विक्रेते अमोल जगताप यांनी सांगितले. पेर, सफरचंद महाग झाले आहेत, असे फळविक्रेते शशिभूषण पाठक यांनी सांगितले.
तेलाच्या दरांत वाढ होत चालली आहे. या आठवड्यातही तेल महाग आहे, तर नारळ पन्नाशीवर असल्याचे किराणा विक्रेते दीपक जाधव यांनी सांगितले. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान नारळ मालवण, मैसूर, कलिकत, मद्रास या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत, असे जाधव पुढे म्हणाले.
सफरचंद होलसेलला १२०-१२४ रु. किलो, किरकोळमध्ये १४० रु. किलोने आहेत. याआधी सफरचंद १०० रु. किलो होते. पेर होलसेलला १८०० रुपये १२ किलो, तर किरकोळमध्ये १८० रु. किलो, द्राक्ष होलसेलमध्ये ११०० रु. १० किलो, तर १४०-१५० रु. किरकोळमध्ये आहे.
तेल होलसेलमध्ये ११० ते १४९ रु. लीटर, किरकोळला १२० ते १६० रु. लीटर आहे. १६० रु. लीटर मिळणारे तेल आधी १३० ते १३५ रु. लीटरने मिळत होते. नारळ होलसेलमध्ये १७ ते ४० रु. तर किरकोळमध्ये २०-५० रु.प्रमाणे मिळत आहे.
मेथी होलसेलमध्ये १२ ते १५ रु, तर किरकोळमध्ये २५ रु. जुडी, शेपू होलसेलमध्ये ८ ते १० रु. तर किरकोळमध्ये १५ रु. जुडी, कोथिंबीर होलसेलला १२ ते १५ रु. तर किरकोळमध्ये २० ते २५ रु. जुडी, चवळी, पालक होलसेलमध्ये ८ ते ९ रु., किरकोळमध्ये १५ रु. जुडी मिळत आहे.
दिवाळीपासून सुके खोबरे आणि तेलाचे दर वाढतच होते. मध्यंतरी एक किलो सुके खोबरे २०० रु. किलो होते. नवीन वर्षात २२० रु. किलो झाले आहे. एक लीटर तेल १२० रु. किलो झाले आहे. तेलापेक्षा सुक्या खोबऱ्यालाच जास्त भाव आला आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. - रेश्मा मोरे, ग्राहक
शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे भाज्यांची लागवड कमी प्रमाणात होत असल्याने भाज्यांचे दर वाढत आहेत.
- अमोल जगताप, भाजीविक्रेता
सफरचंद पुन्हा महागले आहेत. द्राक्षाची आवक वाढली की त्याचेही दर कमी होतील.
- शशिभूषण पाठक, फळविक्रेता