कंत्राटी सफाई कामगाराकडून मलमपट्टी, भीमसेन जोशी रूग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 02:17 AM2019-11-25T02:17:00+5:302019-11-25T02:20:13+5:30

मीरा भार्इंदर महापालिकेच्या आणि सध्या सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात जखमी रुग्णांची मलमपट्टी चक्के कंत्राटी सफाई कामगारच करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Ointment by contract cleaning worker in Bhimasen Joshi Hospital | कंत्राटी सफाई कामगाराकडून मलमपट्टी, भीमसेन जोशी रूग्णालयातील प्रकार

कंत्राटी सफाई कामगाराकडून मलमपट्टी, भीमसेन जोशी रूग्णालयातील प्रकार

Next

भार्इंदर : मीरा भार्इंदर महापालिकेच्या आणि सध्या सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात जखमी रुग्णांची मलमपट्टी चक्के कंत्राटी सफाई कामगारच करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आधीच विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या या रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप असून आता घडल्या प्रकाराने येथील रूग्णांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या जोशी रुग्णालयात शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभागच नसून रूग्णालय केवळ नावापुरतेच आहे. चांगले डॉक्टर व वैद्यकीय सुविधा नसल्याने उपचाराच्या आशेने येणाऱ्या रूग्णांचे अतोनात हाल झाल्याचे अनेक किस्से आहेत. उपचाराअभावी काही रुग्णांचा बळी गेला असून अगदी लहान मूल दगावण्यासह रेल्वे स्थानकात प्रसूती होण्याची वेळ महिलेवर आलेली आहे. पालिकेच्या महिला डॉक्टरांनाही येथे योग्य उपचार न झाल्याचा वाईट अनुभव आला होता.

महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना मात्र नागरिकांना चांगली व माफक दरात वैद्यकीय सेवा पुरवण्यात स्वारस्य नसून हे रूग्णालयच सरकारच्या ताब्यात देऊन आपले हात झटकण्याची घाई लागलेली होती. त्यातूनच सरकारने आता हे रूग्णालय आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली घेतले असले तरी बाकी सर्व व्यवस्था, खर्च, कर्मचारी आदी पालिकेनेच द्यायचे आहेत. परंतु पालिका आणि राजकारणी या रूग्णालयात घडणाºया घटनांपासून आपले हात झटकण्यासाठी सतत सरकारकडे बोट दाखवत आले आहेत.
रुग्णालय पालिकेचे आणि सरकारच्या प्रशाकीय नियंत्रणाखाली असताना जखमी रूग्णांची मलमपट्टी चक्क कंत्राटी सफाई कामगार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुर्धा येथे राहणारा समीर म्हादे हा तरुण दुचाकीवरून पडल्याने डोके, हात, पायास जखमा झाल्या होत्या. त्यासाठीचे उपचार जोशी रुग्णालयात सुरु होते. रविवारी सकाळी आठ वाजता समीर हा पट्टी बदलण्यासाठी गेला होता.
जखम साफ करुन पट्टी बदलणे यासारखी कामे ही कुशल परिचारक वा वॉर्डबॉयने करणे आवश्यक असताना तेथे असलेला परिचारक रामकृष्ण यांनी आधीची पट्टी काढून जखम साफ करुन नवीन पट्टी लावण्यासाठी तेथे सफाई काम करत असलेला कंत्राटी सफाई कामगार रोहन याला सांगितले. रोहनने समीरची मलमपट्टी करुन दिली. नंतर तो त्याच्या साफसफाईच्या कामास लागला. हा प्रकार समीरकडून समजल्यावर युवा प्रतिष्ठानचे श्रेयस सावंत - भोसले, गणेश बामणे, आशिष लोटणकर, सुनील कदम, ऋषिकेश नलावडे, निखिल पाटील, विशाल अग्रहरी आदी तरुणांनी थेट रुग्णालयात जाऊन जाब विचारला. रविवार असल्याने डॉक्टरच नव्हते.

पोलिसात तक्रार दाखल
परिचारक रामकृष्ण याला विचारणा केली असता त्याने रुग्णालयात पट्टी बदलणे आदी कामे ही सफाई कामगारच करत असल्याचे सांगितले. हे ऐकून या तरूणांना धक्काच बसला. रूग्णांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार असल्याचा संताप व्यक्त करत त्यांनी भार्इंदर पोलीस ठाण्यात या बाबत लेखी तक्रार करुन रुग्णालयाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. हे निवेदन महापालिकेला देखील देणार असल्याचे बामणे यांनी सांगितले.

Web Title: Ointment by contract cleaning worker in Bhimasen Joshi Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.