भिवंडी गुन्हे शाखेने जप्त केल्या दिड कोटी रूपयांच्या जुन्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 09:57 PM2018-07-03T21:57:24+5:302018-07-03T21:59:51+5:30
भिवंडी : ठाण्यातील कळवा ठाणे येथे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या त्रिकुटास भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नुकतीच अटक केली असून त्यांच्या कडून ५०० व १००० दराच्या १ कोटी ६८ लाख ५०हजार रु पये जुन्या नोटा जप्त केल्या आहेत .
भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीसांंना आपल्या गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील कळवा परिसरांत काही इसम जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी येणार आहेत,असे समजले.त्यानुसार कळवा येथील पारसीक सर्कल हॉटेल अमीत गार्डन येथे त्यांनी सापळा लावला. तेथे येऊन बसलेल्या राजन मुत्तूस्वामी तेवर, इम्रान अहमद शेख व शेखर कैलास जाधव यांना ताब्यात घेत त्याच्याजवळील बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये जुन्या ५००रूपयांची ३३८ बंडले तर १०००रूपयांच्या १२ नोटा सापडल्या. त्यांची अधीक चौकशी केली असता ते जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी त्या ठिकाणी आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.ही कारवाई भिवंडी गुन्हे-अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपरिरिक्षक संतोष चौधरी, कर्मचारी विकास लोहार,श्रीधर हुंडेकरी, प्रमोद धाडवे या पथकाने केली.या प्रकरणी तिघांवर कळवा येथे कलम ४,५,६,७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी अटक केलेले आरोपी राजन मुत्तुस्वामी तेवर व इम्रान अहमद शेख हे ठाण्यातील असून शेखर कैलास जाधव हा सायन कोळीवाडा,मुंबई येथील रहाणारा आहे.त्यांच्या कडून सदरच्या नोटा जप्त केल्या असून त्या नोटा त्यांनी कोठून व कोणाकडून बदलून घेण्यासाठी आणल्या होत्या याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत .