पुणधे येथील पुरातन लेणी नामशेष होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 04:13 AM2019-03-19T04:13:46+5:302019-03-19T04:14:24+5:30

गड, किल्ले, लेणी या इतिहासाच्या पाऊलखुणा समजल्या जातात. त्याच्यावरून आपल्या समाजाची, संस्कृतीची तसेच चालीरीतींची ओळख होते.

 Old caves in Punadhe will be extinct? | पुणधे येथील पुरातन लेणी नामशेष होणार?

पुणधे येथील पुरातन लेणी नामशेष होणार?

Next

- वसंत पानसरे
किन्हवली  - गड, किल्ले, लेणी या इतिहासाच्या पाऊलखुणा समजल्या जातात. त्याच्यावरून आपल्या समाजाची, संस्कृतीची तसेच चालीरीतींची ओळख होते.
शहापूर शहराजवळील आटगाव-पुणधे येथील इतिहासकालीन पांडवलेणी हा असाच एक अनमोल ठेवा असून सध्या मात्र तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुरातत्त्व विभागाने वेळीच याकडे लक्ष देऊन त्याचा जीर्णोद्धार करण्याची मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारादरम्यान आटगाव स्थानक आहे. शहापूरपासून केवळ पाच किमी अंतरावरील आटगावपासून अगदी जवळ म्हणजे केवळ दोन किमीच्या अंतरावर पुणधेजवळ एक टेकडी आहे. या टेकडीच्या शिखरावर भग्नावस्थेत ही लेणी आहेत. या लेण्यांमध्ये अनेक रेखीव शिल्पे आहेत. या लेण्यांची उभारणी केव्हा झाली, ती कुणी बांधली, याविषयी कुठेच माहिती उपलब्ध नाही. मात्र, या लेण्यांचा काळ इ.स. ५५० ते ९०० असावा, असा अंदाज आहे.
पुणधेपासून अगदी अर्धा किमीच्या अंतरावरील या लेण्यांकडे पुणधे गावातून जाणारी एक पायवाट आहे. काट्याकुट्यांनी वेढलेल्या या रस्त्याने टेकडी चढल्यावर प्रथम आपणास दिसतात, ते प्रवेशद्वाराजवळील दोन स्तंभ. त्यावर आकर्षक कोरीवकाम असून पुरातनकाळातील शिल्पकलेचा आविष्कार दिसतो. मध्यभागी एक मंदिर असून या मंदिराला घडीव दगडांचा पाया असून त्यावर मोठी शिल्पे दिसतात. या लेण्यांना भेट दिल्यावर काही शिल्पशिला इतस्तत: पडलेल्या दिसतात.
या लेण्यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या आस्थेने येतात. मात्र, इथे पिण्यासाठी पाणी नाही, जाण्यासाठी रस्ता नाही की, विश्रांतीगृहही नाही. रस्त्यावरील दगडगोटे तसेच काट्याकुट्यांमधून रस्ता काढत जावे लागते.
सध्या पांडवलेण्यांत करवंदांच्या झाडीत सापडलेल्या देवीची स्थापना करण्यात आली असून अधूनमधून या देवीची पूजा केली जाते. नवरात्र तसेच रामनवमीला येथे उत्सव भरतो. लेण्यांतील अलंकारिक वैभव केव्हाच नष्ट झाले आहे. त्यातील सौंदर्य पुन्हा प्रस्थापित करायचा, असेल तर या लेण्यांच्या जीर्णोद्धाराची गरज आहे.

या लेण्यांतील शिलांचे आणि स्तंभांवरील शिल्पांचे घारापुरीतील लेण्यांमधील शिल्पांशी साधर्म्य वाटते. इ.स. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुरबाड, वाडा, म्हसा भागांतील शैवपंथीय तसेच ग्रामदेवतेची मंदिरे मोगलांच्या आक्र मणाने उद्ध्वस्त झाली, असे इतिहास सांगतो. पुणधे येथील भग्नावस्थेतील ही लेणीही बहुधा त्याच्या तडाख्यात सापडली असावीत.

ऐतिहासिक वारसा असलेल्या आटगाव-पुणधेतील लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र, या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांची सुविधा नाही. पाणी, रस्ते, विश्रांतीगृह, सुरक्षितता अशा कोणत्याच सुविधा येथे नसल्याने इतिहास अभ्यासक नाराज होतात. येथे मोठ्या प्रमाणात शिल्पे विखुरलेल्या स्थितीत पडून असल्याने ती नामशेष होण्याचा धोका आहे. याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. - राम विशे, इतिहास अभ्यासक
वनविभागाकडून याठिकाणी काळजी म्हणून काँक्रि टीकरण करण्यात आले आहे. वनसंवर्धनाप्रमाणेच अशी पुरातन प्राचीन लेणी जोपासली पाहिजे.
-सुनील वेखंडे, सचिव, सह्याद्री वनसंवर्धन संस्था

Web Title:  Old caves in Punadhe will be extinct?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.