उल्हासनगरात भुयारी गटार कामात जुनेच चेंबर?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 07:49 PM2024-03-03T19:49:18+5:302024-03-03T19:49:27+5:30
भुयारी गटार व पाणी योजना वादात, रिपाइं व काँग्रेस ठोठावणार न्यायालायचा दरवाजा.
उल्हासनगर : शहरातील विविध भागात रस्ते खोदून भुयारी गटारीचे नवीन पाईप टाकण्याचे काम एकीकडे सुरू असताना दुसरीकडे गटारीच्या जुन्याच चेंबरचा वापर होत आहे. याकामाच्या अनियमित बाबत रिपाइं व काँग्रेसने चौकशीची मागणी करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा दिला आहे.
उल्हासनगरात ४२३ कोटीच्या निधीतून भुयारी गटार योजनेच्या तिसऱ्या टप्याचे काम सुरू झाले. पहिल्या टप्यात शहराबाहेरील मुख्य गटारीचे नव्याने पाईप टाकण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात वडोलगाव, खडेगोळविली व शांतीनगर आदी ठिकाणी मलनिस्सारण केंद्र सुरू केली. तर तिसऱ्या टप्यात शहर अंतर्गत भुयारी गटारीचे नव्याने पाईप टाकण्यात येत आहे. याच बरोबर नव्याने गटारीचे चेंबर बांधण्याचा उल्लेख ठेक्यात असून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे व आयुक्त अजीज शेख यांनी दिली. प्रत्यक्षात योजनेच्या ब्ल्यूप्रिंट शिवाय भुयारी गटारीचे काम सुरू असल्याचा आरोप शहरातून होत आहे.
रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या टेंडरवॉर पत्रकार परिषेदेत भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा वितरण योजनेच्या कामाबाबत न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे संकेत दिले. तसेच काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीही भुयारी गटारीच्या अनियमित कामावर नाराजी व्यक्त करून महापालिका आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली. भुयारी गटार योजनेत रस्ते खोदून गटारीचे नवीन पाईप टाकल्यानंतर नव्याने भुयारी चेंबर बांधून खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याची अट आहे. प्रत्यक्षात जुन्याच चेंबरला दुरस्तीला मुलायमा दिला जात असून गेल्या ३ महिन्यात खोदलेल्या एकाही रस्त्याची दुरुस्ती केली नसल्याचे चित्र शहरात आहे. खोदलेले रस्ते दुरस्त केले नसल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणात वाढ झाली आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी मात्र खोदलेले रस्ते दुरुस्त केले जाणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच गटारीचे चेंबर नव्याने बांधण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
भुयारी गटारीमुळे खोदलेल्या रस्त्याची दुरस्ती कधी?
शहरात गेल्या ३ महिन्यापासून रस्ते खोदून नव्याने गटारीचे काम सुरू आहे. खोदलेले रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची अट असतांना आजपर्यंत एकाही रस्त्याची दुरुस्ती केली नाही. तसेच गटारीचे नव्याने चेंबर न बांधता जुनेच चेंबर वापरत असल्याचा आरोप होत आहे.