‘पाळणाघरांच्या शहरा’त आता वृद्धाश्रम; आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठांनी केली होती मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:29 AM2019-09-08T00:29:55+5:302019-09-08T00:30:15+5:30
वृद्धांची संख्या दीड लाख
मुरलीधर भवार
डोंबिवली : डोंबिवलीत घराघरातील पती-पत्नी दोघेही चाकरमानी त्यामुळे या शहराची ओळख ै‘बेडरुम सिटी’ अशी आहे. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी नवविवाहितांच्या पसंतीचे शहर डोंबिवली असल्याने नोकरी करणाऱ्या पालकांच्या मुलांना सांभाळण्यासाठी शहरात पाळणाघरे आणि नोकरदार जोडप्यांच्या सोयीकरिता पोळीभाजी केंद्रे सुरु झाली. ‘पाळणाघरांचे शहर’ अशी ओळख निर्माण केलेल्या डोंबिवलीत आजमितीस वृद्धांची संख्या दीड लाख आहे. पूर्वी मुलांचा संभाळ करण्याची समस्या होती आता वृद्धांची काळजी घेण्याची समस्या भेडसावू लागल्याने पाळणाघरांच्या शहरात वृद्धाश्रमाची सोय केली जात आहे.
उद्या, रविवार ८ सप्टेंबर रोजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व महापालिकेच्या सहकार्याने ‘आपलं घर’ या वृद्धाश्रमाचा शुभारंभ होणार आहे. ज्येष्ठ नागरीकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणारे रमेश पारखे यांनी सांगितले की, डोंबिवलीतील पती-पत्नी हे नोकरदार आहेत. त्यांच्या आई वडिलांना दिवसभर कोणी सांभाळायचे ही समस्या शहरातील नागरिकांना भेडसावत आहे. शहरातील वृद्धांची संख्या १ लाख ५० हजार इतकी आहे. डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरीक महासंघाच्या छत्रछायेखाली १७ ज्येष्ठ नागरीक संघ काम करीत आहेत. या संघाचेच जवळपास ७० हजार अधिकृत सभासद आहेत. याखेरीज अनेक वृद्धांची नोंद महासंघाकडे आहे. डोंबिवलीतील वृद्धांची संख्या लक्षणीय असल्याने वृद्धाश्रमाची गरज निर्माण झाली आहे.
शहरात चार वृद्धाश्रम कार्यरत आहेत. या वृद्धाश्रमांतून एका वृद्धाची काळजी घेण्यासाठी महिन्याकाठी किमान सहा व कमाल१४ हजार रुपये घेतले जातात. मात्र ज्या वृद्धांना कोणताच आधार नाही. ते आर्थिकदृष्ट्या निराधार आहेत. त्यांची फी कोण भरणार. त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची आहे. एक कार्यकर्ता या नात्याने समाजात वावरत असताना राज्यमंत्री चव्हाण यांच्याकडे अनेक वृद्धांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत. अनेकांच्या तक्रारी त्यांना संभाळणारे कोणी नाही, हीच आहे. अनेकांकडे पुरेसा पैसा नाही.
गेल्या काही वर्षांत माणसाचे सरासरी आयुर्मान वाढले असल्याने निवृत्तीनंतर मिळालेला पैसा हा पुढील १५ ते २० वर्षांत औषधोपचार, मुलांची लग्नकार्य यामध्ये संपून गेला. काहींची मुले-मुली विदेशात शिक्षणाकरिता गेली ती तिकडेच राहिली. त्यांचा कुटुंबाचा पसारा वाढल्याने ते आपल्या आई-वडीलांची संपूर्ण जबाबदारी उचलू शकत नाहीत. मात्र आयुष्याची दोरी तुटत नाही आणि खिशात फारसा पैसा नाही. त्यामुळे ते वृद्धाश्रमात पैसे भरुन राहू शकत नाही. काही वृद्धांच्या अशा कहाण्या ऐकून मन हेलावून गेलेल्या आ. चव्हाण यांनी महापालिकेकडे वृद्धाश्रमासाठी जागा मागितली. या जागेत १०० बेडची क्षमता असलेला एक सुसज्ज वृद्धाश्रम सुरु करण्यात येणार आहे. तेथे वृद्धांच्या भोजनाची, औषधांची व करमणुकीची व्यवस्था केली आहे.
क्षमता १०० बेडची असली तरी तूर्तास ५० बेड ठेवण्यात आले आहेत. प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्वावर निराधार वृद्धांना प्रवेश दिला जाणार आहे. मोफत सेवा देणाºया या वृद्धाश्रमाचे अर्थकारण हे मदत देणाºया दानशूर व्यक्तींच्या दातृत्त्वावर अवलंबून असणार आहे. समाजातील अनेकांकडून चांगल्या कामासाठी आर्थिक हातभार लागला जातो. त्याच जोरावर ‘आपलं घर’ हा वृद्धाश्रम चालवला जाणार आहे.
बेघर वृद्धांनी दिली वृद्धाश्रम सुरू करण्याची प्रेरणा
आ. चव्हाण हे कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी गेले होते. त्यावेळी एका पेपरमध्ये आलेली बातमी त्यांच्या वाचनात आली होती. ती अशी की, ‘कुडाळनजीकच्या गावातील एका वृद्धाश्रमातील वृद्ध रस्त्यावर’ हा मथळा वाचून चव्हाण हे व्यथित झाले. त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. जाऊन पाहिले तर वृद्धाश्रम चालवणाºया व्यक्तीने वृद्धाश्रमाची जागा भाड्याने घेतली होती.
काही कारणास्तव मालकाने भाड्याची जागा खाली करण्यास सांगितल्यावर वृद्ध रस्त्यावर आल्याचे चित्र होते. तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून काही दिवसांकरिता त्या वृद्धांना सरकारी रुग्णालयात ठेवले. वृद्धाश्रमाकरीता स्वत: यथाशक्ती मदत देत अन्य लोकांना मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यातून तो वृद्धाश्रम पुन्हा त्याच जागेवर सुरु झाला. याच प्रसंगातून डोंबिवलीतील ‘आपलं घर’ हा वृद्धाश्रम सुरु करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. कायकर्ता दशेत असताना चव्हाण यांना वाटायचे की हाती सत्ता व पैसा आल्यावर त्यातून काही चांगले काम उभे करावे. तेव्हापासून डोक्यात वृद्धाश्रम सुरु करण्याचा विचार घोळत होता.