जुना कसारा घाट आज होणार सुरू, तहसीलदारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 06:13 IST2019-08-17T06:13:27+5:302019-08-17T06:13:52+5:30
यंदाही पावसामुळे जिल्ह्यातील कसारा घाट व माळशेज घाटातील विविध समस्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवली आहे.

जुना कसारा घाट आज होणार सुरू, तहसीलदारांची माहिती
- सुरेश लोखंडे
ठाणे : यंदाही पावसामुळे जिल्ह्यातील कसारा घाट व माळशेज घाटातील विविध समस्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या उद्भवली आहे. जुन्या कसारा घाटातील महामार्गाला तडे गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करून १५ दिवसांपासून काम सुरू आहे. मात्र, नियोजनानुसार १७ आॅगस्टला हा मार्ग सुरू करण्याचे संकेत आहेत.
मुंबई-आग्रा हा राष्टÑीय महामार्ग कसारा घाटातून जातो. मात्र, जुलैअखेर या जुन्या कसारा घाटातील महामार्गाला तडे गेले होते. मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली. या घाटातील महामार्गावर सुमारे ५०० मीटर रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे या मार्गावरील जीवघेणी वाहतूककोंडी संपवण्यासाठी नव्या कसारा घाटातील महामार्गाने वाहतूक वळवून जुन्या कसारा घाटातील काम युद्धपातळीवर हाती घेतले. सुमारे १५ दिवसांपासून ते सुरू आहे. यामुळे या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद केली आहे.
जुन्या कसारा घाटातील रस्त्याला पडलेल्या भेगा दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे. या कामात अडथळा नको म्हणून मुंबईहून नाशिकला जाणारी आणि नाशिकहून मुंंबईला येणारी वाहतूक नव्या कसारा घाटातून गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे. यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडीला चालक सामोरे जात आहेत. पण, आता जुन्या घाटातील रस्त्यांचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. ठेकेदाराने १७ आॅगस्टपर्यंतचे काम पूर्ण करण्याचे आश्वासनही दिलेले आहे. यामुळे शनिवारी संध्याकाळपर्यंत जुन्या कसारा घाटातून वाहतूक सुरळीत सुरू होण्याची अपेक्षा शहापूर तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी व्यक्त केली आहे. यामुळे आता या घाटातील जीवघेण्या वाहतूककोंडीतून चालकांची सुटका होणार आहे.
माळशेज घाटातील वाहतूक सुरळीत
माळशेज घाटात शुक्रवारी काही ठिकाणी किंचित दरडी कोसळून रस्त्यावर माती पडली. मात्र, या घाटातील वाहतूक खोळंबू न देता ती सुरळीत असल्याचे महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले.