अपघातानंतर तासभर रुग्णवाहिका न मिळाल्याने वृद्धेचा मृत्यू; पोलीस व्हॅनची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 11:48 PM2020-09-07T23:48:35+5:302020-09-07T23:48:56+5:30
सध्या महापालिकेकडे एकूण ८९ रुग्णवाहिका आहेत.
कल्याण : कल्याणमध्ये एका वृद्ध महिलेचा अपघात झाल्यानंतर तब्बल एक तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अखेर या महिलेला पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. महिलेला वेळेत उपचार मिळाले असते तर तिचा मृत्यू झाला नसता. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा ती बळी ठरली, असा आरोप स्थानिक नगरसेवकाने केला.
कल्याण पूर्वेतील पुणे लिंकरोडवर एका भरधाव दुचाकी चालकाने या महिलेस धडक दिली. या महिलेच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. स्थानिक नागरिकांसह शिवसेना नगरसेवक गायकवाड यांनी महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मागविण्याकरीता संपर्क साधला.
रुग्णवाहिका तब्बल तासभर आलीच नाही. याच रस्त्याने एक पोलीस व्हॅन येताना दिसली. सर्वानी पोलिसांना विनंती केल्याने तिला व्हॅनमध्ये ठेवून उपचाराकरिता उल्हासनगरातील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र तिला रुग्णालयात दाखल करण्यास उशिर झाल्याने तिचा मृत्यू झाला. मृत महिला नक्की कुठे राहते, ती कोण आहे, याची महिती उघड झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महापालिकेकडे कोरोनापूर्वी सहा रुग्णवाहिका होत्या. रुग्णसंख्या वाढली, तेव्हा महापालिकेने जवळपास ७४ रुग्णवाहिका भाड्याने घेतल्या. महापालिकेकडे स्वत:च्या आणि भाड्याने घेतलेल्या अशा एकूण ८० रुग्णवाहिका आहेत. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी खा. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने महापालिकेस ९ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.
सध्या महापालिकेकडे एकूण ८९ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी एकही रुग्णवाहिका नगरसेवकाने विनंती करूनही उपलब्ध होऊ शकली नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.