पोलिसांमुळे वृद्धाची मुलाशी झाली पुनर्भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 11:59 PM2019-10-13T23:59:05+5:302019-10-14T00:00:02+5:30
व्हॉट्सअॅपमुळे लागला शोध : निवाराकेंद्रातून पुन्हा परतले घरी
जितेंद्र कालेकर
ठाणे : स्मृतिभ्रंश झालेले ७५ वर्षीय राजेंद्र वर्मा या आजोबांना आपला पत्ता सांगता येत नव्हता. त्यांच्या नातेवाइकांचा शोध न लागल्याने नौपाडा पोलिसांनी त्यांना ठाणे महापालिकेच्या निवाराकेंद्रात आश्रय दिला होता. तोपर्यंत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाइकांना त्यांची माहिती मिळाल्यानंतर वर्मा यांची अखेर निवाराकेंद्रातून गुरुवारी घरवापसी घडली.
नौपाड्यातील बीटमार्शल पोलीस शिपाई गणेश मदन यांना १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अलोक हॉटेल येथील रस्त्यावरून फिरणारे एक वयोवृद्ध आजोबा आढळले. त्यांची त्यांनी विचारपूस केली असता, राजेंद्र शर्मा (७५) इतकीच त्यांनी स्वत:ची ओळख सांगितली. परंतु, त्यांना आपला पत्ता सांगता येत नव्हता. अंगात धोती-कुर्ता परिधान केलेल्या शर्मा यांच्या नातेवाइकांचा नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, पोलीस हवालदार एस.एल. पाटील, महिला पोलीस नाईक ए.बी. नाईक आणि कॉन्स्टेबल एस.एस. शेळके यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नातेवाइकांचा काहीच शोध न लागल्याने ठाणे महापालिकेच्या बेघर निवाराकेंद्राचे व्यवस्थापक संदीप कदम यांच्या ताब्यात त्यांना देण्यात आले. कदम यांच्यासह ते याठिकाणी पोहोचले. त्याचवेळी कोपरी पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा रामसुचित राजेंद्र शर्मा (५८, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणे) हे त्यांचा शोध घेत कोपरी पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथेच त्यांना आपले वडील नौपाडा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली. कोपरी पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर मिळालेला फोटो त्यांना दाखविल्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. कदम यांना पुन्हा पाचारण करून राजेंद्र शर्मा यांना त्यांचा मुलगा रामसुचित यांच्या ताब्यात सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या पथकाने दिले.
पोलिसांनी ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तसेच इतर ठिकाणीही राजेंद्र शर्मा यांची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे पाठविली. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोणताही पत्ता नीट सांगता येत नसतानाही राजेंद्र शर्मा पुन्हा कुटुंबीयांना भेटू शकले. या सौहार्दाबद्दल शर्मा कुटुंबीयांनी नौपाडा पोलिसांचे आभार मानले.