कपडे वाटपाचे आमिष दाखवून वृद्धेचे दागिने लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:32+5:302021-05-28T04:29:32+5:30
ठाणे : किसननगर येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धेला साड्या वाटपाचे आमिष दाखवून तिच्याकडील ३० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या दोघा ...
ठाणे : किसननगर येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धेला साड्या वाटपाचे आमिष दाखवून तिच्याकडील ३० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या दोघा भामट्यांनी लुबाडल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किसननगर क्रमांक-३ येथे राहणारी ही वृद्ध महिला २४ मे रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यानंतर केसरी निवासजवळील फुलगल्ली येथून पायी जात होती. त्याचवेळी मास्क परिधान केलेले २५ ते ३० वयोगटातील दोघेजण तिथे आले. दोघांपैकी एकाने या वृद्धेला बतावणी केली की, ‘आजी पुढे जैन मंदिरात बाहेरून आलेले लोक गरीब लोकांना साड्या, चप्पल आणि १२०० रुपयांचे वाटप करीत आहेत. तिथे गरिबासारखे जायचे असल्यामुळे तुम्ही हातातील सोन्याच्या बांगड्या पर्समध्ये ठेवा,’ असा बहाणा करीत तिचा त्यांनी विश्वास संपादन केला. या वृद्धेने तिच्या हातातील २० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या पर्समध्ये ठेवून एका कापडी पिशवीत ठेवल्या. त्याचवेळी त्याच्या साथीदाराने दोनशे रुपये आणि आंब्याची पिशवी या वृद्धेला देऊन तिची नजर चुकवून ‘आजी, तुम्ही इथेच थांबा आम्ही तुमच्यासाठी साडी, चप्पल आणि पैसे घेऊन येतो,’ असा पुन्हा बहाणा करीत तिच्याकडील सोन्याच्या बांगड्यांची पर्स घेऊन तिथून पलायन केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस.आर. सहारे हे अधिक तपास करीत आहेत.
..................................