जुन्या वटवृक्षाचा घोटला गळा?, पर्यावरणप्रेमी नागरिकाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:26 AM2019-05-29T00:26:31+5:302019-05-29T00:28:41+5:30
३०० वर्षे जुन्या असलेल्या वडाच्या वृक्षाचा गळा घोटण्याचे काम सध्या ढोकाळी येथे एका विकासकाच्या माध्यमातून सुरू असल्याची बाब ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकाने उघडकीस आणली आहे.
ठाणे : ३०० वर्षे जुन्या असलेल्या वडाच्या वृक्षाचा गळा घोटण्याचे काम सध्या ढोकाळी येथे एका विकासकाच्या माध्यमातून सुरू असल्याची बाब ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकाने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी रोहीत जोशी यांनी वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे लेखी तक्रार केली असून संबधीत विकासकाच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
सध्या ढोकाळी येथे एका विकासकाच्या प्रकल्पाचे काम सुरूआहे. परंतु, या ठिकाणी २०० फुटांचा घेर असलेला आणि ३०० वर्षे जुन्या असलेल्या वडाच्या वृक्षाचे आयुर्मान संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याठिकाणी संबधींत विकासकाकडून या वृक्षाला बंदीस्त करण्यात आले असून बाजूला सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले आहे. त्याचे पुरावे सुद्धा जोशी यांनी आयुक्तांना दिले आहेत. मुळात हे वृक्ष जुने असल्याने त्याला हेरीटेजचा दर्जा देण्याची मागणी हरियाली संस्थेच्या पुनम सिंघवी यांनी केली होती. परंतु,अद्यापही त्यांची ही मागणी मान्य झालेली नाही. असे असले तरी आता संबधींत विकासकाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात येत्या १ जून रोजी आंदोलन करण्यात येणार असून २ जून रोजी शहरातील विविध सामाजिक संस्था, दक्ष नागरिक यांना शहरातील अशा १०० वर्षे जुन्या वृक्षांची माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
> ज्या वृक्षासंदर्भात तक्रार आलेली आहे, त्यासंदर्भात कोणतीही परवानगी मागण्यात आलेली नाही, किंवा आम्ही दिलेली नाही. आमच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे. त्या वृक्षाला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. बाजूला खड्डा खोदण्यात आलेला आहे.
- अनुराधा बाबर, वृक्ष प्राधिकरण अधिकारी - ठामपा