वृद्ध महिलेला गंडा घालणारा भामटा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:58+5:302021-07-07T04:49:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन घेऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन घेऊन पसार झालेल्या भामट्याला कुळगाव पोलिसांनी दोन महिन्यानंतर गजाआड केले आहे. हैदर तेहजीब सैय्यद इराणी असे त्याचे नाव असून तो आंबिवली येथे राहणारा असल्याची माहिती कुळगाव पोलिसांनी दिली.
पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्धेची फसवणूक झाल्याप्रकरणी ५ मे रोजी कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे हैदर तेहजीब सैय्यद इराणी याला आंबिवली येथून अटक केली. त्याच्या चौकशीत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हेही उघडकीस आले आहेत. कुळगाव व कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील मिळून सुमारे ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. त्यामध्ये ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने व १५ मोबाइलचा समावेश आहे.
------