काशीमीरा भागातील वृद्ध महिलेच्या खूनाचा लागला छडा
By जितेंद्र कालेकर | Published: November 13, 2018 10:43 PM2018-11-13T22:43:56+5:302018-11-13T22:48:38+5:30
काशीमीरा भागातील रिटा रॉड्रीक या वृद्धेच्या खूनाचा कोणताही धागादोरा नसतांना केवळ सीसीटीव्हीतील एका फूटेजच्या आधारे उत्तरप्रदेशच्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठया कौशल्याने अटक केली. वृद्धेने रागाच्या भरात वापरलेल्या अपशब्दाचा बदला घेण्यासाठी विमान प्रवास करुन त्याने हा खून केल्याची कबूली दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : काशीमीरा येथील रिटा रॉड्रीक (६०) या वृद्धेच्या खूनप्रकरणी संजय उर्फ सोनू रमेशचंद्र वर्मा (३४) या खून्यालाठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठया कौशल्याने अटक केली आहे. त्याच्याकडून खूनातील चाकूही हस्तगत करण्यात आला आहे. त्याला १४ नाव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे खास खून करण्यासाठी आरोपी वर्मा हा कानपूर ते मुंबई असा विमान प्रवासाने आला होता.
काशीमीरा भागातील पूनम गार्डनमधील ‘समृद्धी’ बिल्डींगच्या बी विंगमधील सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या रिटा यांचा ५ नोव्हेंबर २०१८ रोजी खून झाल्याचे आढळले होते. अे विंग मधील एका महिलेने सुरक्षा रक्षकाच्या मदतीने रिटा यांच्या घराचा दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या वृद्धेच्या पोटावर, गळयावर वार करुन मनगटाची शीर कापलेली होती. घटनास्थळी स्थानिक काशीमीरा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरु केला. घरातील सामान अस्ताव्यस्त नसल्यामुळे चोरीचाही प्रकार प्रथमदर्शनी वाटत नव्हता. मुख्य दरवाजा आणि सुरक्षा दरवाजांना लॉक झालेले होते. त्यामुळे ओळखीच्याच व्यक्तीने हा खून केल्याची शक्यता होती. इमारतीचे मुख्य गेट आणि सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही होते. एकटीच राहणाºया रिटाला तिची मोलकरीण हिने रविवारी दुपारी १ वा. पाहिले. त्यामुळे दुपारी १ ते सायंकाळी ५ या दरम्यान तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि उपनिरीक्षक अभिजित टेलर आणि हवालदार किशोर वाडीले यांच्या पथकाने सीसीटीव्हीची पडताळणी केली. तेंव्हा तिथेच पूर्वी ‘ई’ विंग मध्ये राहणारा संजय वर्मा हा दुपारी १२.४५ ते १.४५ या दोन वेळा जातांना आणि येतांना आढळला. पहिल्यांदा त्याने लिफ्टचा वापर केला तर दुसºयांदा जिन्याचा वापर केला. वर्माची चौकशी केली तेंव्हा तो घरगुती भांडणामुळे सहा महिन्यांपूर्वीच काशीमीरा सोडून उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती पुढे आली. त्याच्यावर संशय आल्याने त्याला बडाख यांच्या पथकाने पाचारण केले तेंव्हा अत्यंत आत्मविश्वासाने तो पोलिसांसमोर आला. आपण काहीच केले नसल्याचा दावाही त्याने केला. परंतू, सीसीटीव्हीमध्ये तो दोन वेळा रिटा यांच्याकडे का गेला? याचे उत्तर तो समाधानकारकपणे देऊ शकला नाही. चार महिन्यांपूर्वी त्याने रिटा यांच्याकडे पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी कारची मागणी केली होती. तेंव्हा त्यांनी ‘तुझी औकात आहे का? गाडीत बसण्याची’ असा टोमणा मारुन त्याची खिल्ली उडवली होती. याच रागातून त्याने त्यादिवशी पहिल्या फेरीत त्यांना दिवाळीनिमित्त पेढे दिले. दुसºया फेरीच्या वेळी बेडरुममध्ये त्यांना पाडून त्यांच्यावर अत्यंत क्रूरपणे चाकूचे वार केले. पण त्या बेशुद्धावस्थेत असल्यामुळे कदाचित जिवंत राहिल्या तर नाव सांगतील म्हणून त्यांच्या हाताची शीरही त्याने कापल्याची कबूली दिली. या खूनासाठी कानपूर (उत्तरप्रदेश) ते मुंबई येण्यासाठी ३६०० रुपये तर जाण्यासाठी २१०० रुपये विमान तिकीट काढून पसार झाल्याचेही त्याने सांगितले. पंचनामा करतांना घटनास्थळी रिटा यांच्या अंगावर दागिने नव्हते. पण एका फोटोवरुन तिचे दागिने गेल्याचे आढळले. तेंव्हा सोनसाखळी आणि सोन्याच्या बांगडया असे दहा तोळयांचे दागिने आणि आठ हजारांची रोकड चोरल्याचीही कबूली त्याने दिली. त्याला अखेर ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.