ओम शिव गणेश इमारतीला गेले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:13 AM2018-04-10T03:13:43+5:302018-04-10T03:13:43+5:30
पूर्वेकडील डीएनसी भागातील पी.एस. म्हात्रे कम्पाउंड येथील ओम शिव गणेश सोसायटीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तळ मजल्यावरील खांबांना तडे गेल्याची घटना सोमवारी घडली.
डोंबिवली : पूर्वेकडील डीएनसी भागातील पी.एस. म्हात्रे कम्पाउंड येथील ओम शिव गणेश सोसायटीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तळ मजल्यावरील खांबांना तडे गेल्याची घटना सोमवारी घडली. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या भिंतींना चिरादेखील गेल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या इमारतीमधील २२ कुटुंबांना तत्काळ बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली. यामुळे हे रहिवासी रस्त्यावर आले आहेत.
ओम शिव गणेश सोसायटी २५ वर्षे जुनी असून, त्यात ‘ए’ आणि ‘बी’ अशा दोन विंग आहेत. सोसायटीची इमारत तळ अधिक तीन मजली आहे. काही महिन्यांपूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्यात इमारत दुरुस्तीलायक झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे महिनाभरापूर्वी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. सोमवारी ते काम सुरू असताना सायंकाळी तळ मजल्यावरील दोन खांब खचल्याचे दुरुस्ती करणाºया कंत्राटदाराच्या निदर्शनास आले. या वेळी मोठा आवाजही झाला. त्यामुळे कंत्राटदाराने लागलीच रहिवाशांना खाली उतरण्यास सांगून इमारत रिकामी करून घेतली. याची माहिती अग्निशामक विभाग, महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्थायी समिती सभापती राहुल दामले, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजन मराठे, पप्पू म्हात्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली. राजन यांच्या पत्नी ज्योती मराठे आणि पप्पू यांच्या पत्नी अलका म्हात्रे यांच्या प्रभागात ही इमारत आहे. दरम्यान, येथील रहिवाशांची सोय रात्रनिवारा केंद्रात करणार असल्याची माहिती पप्पू म्हात्रे यांनी दिली.
>दुरुस्तीचे काम चुकीच्या पद्धतीने
इमारतीची दुरुस्ती चुकीच्या पद्धतीने सुरू होती, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. इमारतीच्या या अवस्थेला कंत्राटदार आणि सोसायटीचे पदाधिकारी जबाबदार आहेत, असा आरोपही या वेळी करण्यात आला.
विशेष म्हणजे काही रहिवाशांच्या रोषालाही कंत्राटदार आणि पदाधिकाºयांना सामोरे जावे लागले. घटनास्थळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला.
इमारतीचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू होते, हे मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, पण माझे कोणी ऐकले नाही, अशा शब्दांत नाराजी रहिवासी कैलास पवार यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
यासंदर्भात महापालिकेचे ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत, रोहिणी लोकरे यांनी तातडीने आरसीसी कन्सल्टंट माधव चिकोडी यांना इमारतीची पाहणी करण्यासाठी पाचारण केले. चिकोडी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार इमारत आधी तातडीने रिकामी करणे महत्त्वाचे आहे. वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इमारत रिकामी झाल्यावर काही वेळातच तेथे लोखंडी मुंडे लावणे आवश्यक आहे. त्यानंतर, एकेका कुटुंबप्रमुखाला घरात सोडून महत्त्वाचा ऐवज तातडीने काढून घेण्याची तरतूद करावी लागेल. तसेच सुरक्षिततेच्या कारणामुळे शेजारची इमारतही तातडीने रिकामी करावी आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन चिकोडी यांनी केले.
>आता यांच्याही पुनर्वसनाचा प्रश्न?
इमारत तातडीने रिकामी करायची झाल्यास येथे राहणाºया २२ कुटुंबीयांना तात्पुरता निवारा तरी कसा, कुठे, कधी देता येणार, हे प्रश्न महापालिका अधिकाºयांसमोर उभे राहिले आहेत. पर्यायी व्यवस्था न केल्यास ते बाहेर निघतील का? हा मोठा प्रश्न आहे. नागूबाई निवासच्या रहिवाशांना कचोºयातील बीएसयूपीच्या घरांमध्ये जसा निवारा मिळाला, तशी घरे ‘ओम शिव गणेश’च्या रहिवाशांना मिळणार का? आणि जर घरे मिळाली, तर त्या ठिकाणी येथील रहिवासी वास्तव्याला जाणार का? अशी चर्चा सुरू होती.