पॅकेजवरून ओमी टीम, साईचे भाजपा नेत्यांसोबत खटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:09 AM2017-09-01T01:09:26+5:302017-09-01T01:09:28+5:30
कल्याण-डोंबिवलीच्या पॅकेजप्रमाणेच उल्हासनगरचे पॅकेजही निवडणुकीनंतर हवेत विरले का, असा प्रश्न ओमी टीमसह साई पक्षाने विचारल्याने भाजपाच्या आघाडीतील असंतोषाला तोंड फुटले आहे.
उल्हासनगर : कल्याण-डोंबिवलीच्या पॅकेजप्रमाणेच उल्हासनगरचे पॅकेजही निवडणुकीनंतर हवेत विरले का, असा प्रश्न ओमी टीमसह साई पक्षाने विचारल्याने भाजपाच्या आघाडीतील असंतोषाला तोंड फुटले आहे. भाजपाच्याही काही नगरसेवकांनी त्यांच्या सूरात सूर मिसळल्याने स्तताधारी पक्षातच सारे आलबेल नसल्याचे चित्र उभे राहिले आहे. उल्हासनगरच्या विकास आराखड्याबद्दलही कोणी तोंड उघडण्यास तयार नसल्याने सत्ताधाºयांत अस्वस्थता आहे.
महापालिकेवर भाजपाची सत्ता येऊन सहा महिने झाले. पण शहर विकास आराखडा, मोठ्या योजनेसह विशेष पॅकेज दिले नाही. उल्हासनगर महापालिका स्वबळावर ताब्यात घेण्यासाठी थेट ओमी टीमला भाजपामध्ये घेतले. ओमी टीमच्या सर्व समर्थकांना भाजपाच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरूनही स्वबळावर येण्यासाठी संख्याबळ कमी पडले. अखेर भाजपाने साई पक्षाचा पाठिंबा घेऊन त्यांना महत्वाचे पदे दिली. महापौरपद भाजपाकडे तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती पद साई पक्षाकडे गेले. ओमी टीमला महत्वाचे पदे न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी वाढली आहे. सव्वा वर्षांनी महापौरपद ओमी टीमला देण्याचे आश्वासन दिले आहे.
महापालिका निवडणुकीच्यावेळी भाजपाने शहर विकासासाठी विशेष पॅकेजचे आश्वासन दिले होते. शहरविकास आराखडा १५ दिवसात मंजूर करणे, नगररचनाकाराची नियुक्ती तसेच विशेष निधी देण्याचे मान्य केले होते.
भाजपाचा महापौर बसून सहा महिन्याचा कालावधी होऊनही सरकारने शहरासाठी कोणतीही आकर्षक योजना जाहीर केलेली नाही.
शहर विकास आराखडयाला मंजुरी नाही. मोठ्या योजनेला मान्यता नाही किंवा विशेष पॅकेज नाही. त्यामुळे अंतर्गत धुसफूस वाढली आहे. भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी हे महापौर मीना आयलानींसोबत मुख्यमंत्र्यांना भेटून शहर विकासाबाबत निवेदन देतात. मात्र आश्वासनापलिकडे मुख्यमंत्री काहीएक देत नसल्याने भाजपाच्या नगरसेवकांसह ओमी टीम व साई पक्षातील नगरसेवकांमध्ये असंतोष वाढला आहे.