ओमी टीमची मनधरणी
By admin | Published: June 23, 2017 05:51 AM2017-06-23T05:51:03+5:302017-06-23T05:51:03+5:30
महापालिका प्रभाग समिती सभापतीवरून ओमी टीम व भाजपातील वाद चव्हाटयावर आला. मात्र भाजपाला टीमची मनधरणी करण्यात यश आले असून भाजपा व ओमी टीममध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती सभापतीवरून ओमी टीम व भाजपातील वाद चव्हाटयावर आला. मात्र भाजपाला टीमची मनधरणी करण्यात यश आले असून भाजपा व ओमी टीममध्ये आलबेल असल्याची प्रतिक्रीया शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. तर शिवसेना व ओमी टीममध्ये निवडणुकीपूर्वी बैठक होण्याचे संकेत शिवसेना शहरप्रमुखांनी दिले आहेत. दरम्यान, उद्या प्रभाग आणि विशेष समिती सभापतीपदाची निवडणूक होत आहे.
उल्हासनगर महापालिकेवर ओमी टीमच्या मदतीने महापौर निवडून आणण्यात भाजपाला यश आले. यासाठी भाजपाने साई पक्षाची मदत घेतली. पाठिंब्याच्या बदल्यात साई पक्षाला उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपद दिले. मात्र ज्यांच्यामुळे भाजपाचा झेंडा पालिकेवर फडकला त्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची चर्चा सुरू झाली. ओमी टीमने नगरसेविका शुभांगिनी निकम यांच्यासाठी प्रभाग समिती क्रमांक - ३ चे सभापतीपद भाजपा वरिष्ठांकडे मागितले. मात्र आघाडीतील करारानुसार साई पक्षाला पहिल्या वर्षीचे सभापतीपद देण्याचा शब्द राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला. त्यानुसार साई पक्षाचे अजित गुप्ता यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
भाजपातील ३२ पैकी २१ नगरसेवक ओमी टीमचे आहेत. असे असताना एकही प्रभाग समिती सभापतीपद मिळत नसल्याचा राग ओमी टीमला आला. त्यांनी शिवसेनेसोबत घरोबा करून सभापतीपदासाठी बोलणी सुरू केली. यामुळे भाजपाचे धाबे दणाणले. त्यांनी टीमला सव्वा वर्षानंतर महापौरपदासह दोन प्रभाग समिती सभापतीपद करारात दिल्याची आठवण करून दिली. राज्यमंत्री चव्हाण यांनी मध्यस्थामार्फत व स्वत: ओमी कलानी यांच्याशी चर्चा केली. अखेर टीमची करण्यात मनधरणीत भाजपाला यश आले. मात्र टीमचे समर्थक याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत.
शुक्रवारी प्रभाग समिती सभापती पदासह नऊ विशेष समिती सभापतीपदाची निवडणूक आहे. चारपैकी दोन समिती सभापती पद साई पक्ष तर एक सभापतीपद भाजपाला मिळणार आहे. प्रभाग समिती ४ चे सभापतीपद शिवसेना समर्थक राष्ट्रवादी पक्षाचे भरत गंगोत्री यांच्याकडे जाणार आहे. तसेच ९ पैकी तब्बल ६ विशेष समिती सभापतीपद ओमी टीमला देण्याचे आश्वासन देत इतर तीन पदे साई पक्षाला दिली आहेत.