मीरा-भार्इंदरमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये रंगणार ओल्या पार्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 04:31 AM2018-12-28T04:31:15+5:302018-12-28T04:31:30+5:30
मीरा-भार्इंदरमध्ये बार-लॉज तसेच खाजगी आयोजकांनी थर्टी फर्स्टसाठी ओल्या पार्ट्यांची जय्यत तयारी चालवली असताना दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानेही इको सेन्सेटिव्ह झोन व सरकारी जमिनींवर मद्य पार्ट्यांचे परवाने देण्याचे जाहीर केले आहे.
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये बार-लॉज तसेच खाजगी आयोजकांनी थर्टी फर्स्टसाठी ओल्या पार्ट्यांची जय्यत तयारी चालवली असताना दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानेही इको सेन्सेटिव्ह झोन व सरकारी जमिनींवर मद्य पार्ट्यांचे परवाने देण्याचे जाहीर केले आहे. तर, वनविभागाने काजूपाडा ते घोडबंदर आदी इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये ध्वनिक्षेपकांना परवानगी देऊ नका, म्हणून पोलिसांना कळवले आहे. पोलिसांनीही मद्यपींसह अनैतिक प्रकारांना रोखण्यासाठी कंबर कसली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळचा काजूपाडा, चेणे हा परिसर पूर्णपणे, तर वरसावे, घोडबंदर, काशिमीरा आदी परिसर अंशत: केंद्र सरकारच्या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो. त्यामुळे या भागात ध्वनिप्रदूषण, खुलेआम चालणाऱ्या पार्ट्या आदींमुळे वन्यजीवांना त्रास होतो. तसे असले तरी नियम-कायदे धाब्यावर बसवून या भागात सर्रास ध्वनिक्षेपकांचा वापर करून ध्वनिप्रदूषण केले जाते. शिवाय, उघड्यावर तसेच वनहद्दीत मद्यपान केले जाते.
उत्तन आदी भागांत सरकारी जमिनी बळकावून बार व लॉज बेकायदा बांधण्यात आले आहेत. त्याला महापालिकेने अग्निशमन परवाना, करआकारणी केली आहे. अन्न व औषध प्रशासन परवाने देते, तर उत्पादन शुल्क विभागही मद्याचे परवाने देतो. स्थानिक पोलीस ठाणेही ध्वनिक्षेपकास परवानगी देते.
शहरातील आॅर्केस्ट्रा बार, लॉजसह अन्य बार व खाजगी आयोजकांनी ‘थर्टी फर्स्ट’ची जय्यत तयारी चालवली आहे. आॅर्केस्ट्रा बारच्या आड सर्रास बारबालांचे अश्लील नृत्य, चाळे चालत असल्याचे, तर लॉजमधून वेश्या व्यवसाय चालत असल्याचे पोलिसांच्या छाप्यातून उघड झाले आहे. त्यामुळे आॅर्केस्ट्रा बार, लॉजसह अन्य बार व खाजगी जागांवर पोलिसांना करडी नजर ठेवावी लागणार आहे. काजूपाडा, चेणे, वरसावे व काशिमीरा तसेच उत्तन परिसरात पार्ट्या होतात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.
एक दिवसासाठी दिला जाणारा मद्य परवाना आॅनलाइन झाला आहे. इको सेन्सेटिव्ह झोन असला वा जागा सरकारी असली, तरी मद्याचा परवाना हा तात्पुरता असतो.
- अभिजित देशमुख, निरीक्षक, उत्पादन शुल्क
चेणे, काजूपाडा, वरसावे, घोडबंदर आदी वनविभागाच्या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये असल्याने काशिमीरा पोलिसांना वनविभागामार्फत कार्यवाहीसाठी पत्र देण्यात आले आहे. - डी.सी. देशमुख, वनक्षेत्रपाल, ठाणे
आॅर्केस्ट्रा बार, लॉज आदींवर खास पाळत ठेवली आहे. जागोजागी नाकाबंदी सुरू केली आहे. मद्यपान करून हुल्लडबाजी करणाºयांवर कारवाई केली जाईल.
- अतुल कुलकर्णी, सहायक पोलीस अधीक्षक
वाहतूक पोलिसांचे सात ठिकाणी तपासणी नाके आहेत. तेथे मद्यपी वाहनचालकांवर कारवाईसाठी ब्रेथ एन्लायझर यंत्रे ठेवली आहेत. स्थानिक पोलिसांचेही तपासणी नाके असणार आहेत. चालकास मद्य देऊ नये वा मद्यपान केल्यावर चालकास सोडण्याची व्यवस्था बारचालकांनी करण्याचे कळवले आहे. - जगदीश शिंदे, वरिष्ठ निरीक्षक,
वाहतूक शाखा