ओमींनी केला युतीचा पराभव
By admin | Published: October 26, 2016 05:23 AM2016-10-26T05:23:22+5:302016-10-26T05:23:22+5:30
उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू पाहात असलेले ओमी कलानी यांचा भाजपा प्रवेश लांबला असला, तरी परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीत
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू पाहात असलेले ओमी कलानी यांचा भाजपा प्रवेश लांबला असला, तरी परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीत त्या पक्षाच्या बंडखोराला पाठिंबा देत त्यांनी मंगळवारी शिवसेनेला धूळ चारली आणि युतीलाही पराभवाचा धक्का दिला.
या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर मोहन रामवानी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे कृष्णदत्त तिवारी यांचा पराभव केला. दोघांनाही समसमान सहा मते मिळाल्याने चिठ्ठीच्या आधारे रामवानी विजयी झाल्याचे पीठासीन अधिकारी व ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घोषित केले.
या पदासाठी राष्ट्रवादीचे दिलीप मिश्रा, शिवसेनेचे कृष्णदत्त तिवारी यांच्यासह विद्यमान सभापती व भाजपाचे बंडखोर मोहन रामवानी यांनी अर्ज भरले होते. तिवारी आणि मिश्रा यांच्यात थेट लढत होऊन शिवसेनेचे तिवारी विजयी होतील, असा अंदाज होता. मात्र ओमी कलानी टीमने सूत्रे हालवत बंडखोर मोहन रामवानी यांना पाठिंबा देऊन विजयी केले. परिवहन समितीत शिवसेनेचे तीन, भाजपाचे दोन, रिपाइंचा एक, राष्ट्वादीचे तीन, साई पक्षाचे दोन, काँग्रेसचा एक, स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे असे १३ सदस्यांचे बळ आहे. निवडणुकीपूर्वी मिश्रा यांनी अर्ज मागे घेतला. काँग्रेसचा उमेदवार तटस्थ राहिला. तिवारी व रामवानी यांना प्रत्येकी ६ मते मिळाली.
‘युतीचा पराभव हेच ध्येय्य’
ओमी कालानी, मोहन लासी, कमलेश निकम, कुमारी ठाकूर यांच्या खेळीने शिवसेना-भाजपाला धक्का मिळाला. दशकभराच्या सत्ता काळात एकही योजना पुर्ण न करून शकलेल्या महायुतीने शहर बकाल केल्याचा आरोप ओमी यांनी केला. सेनेसह भाजपातील दिग्गजांचा पालिका निवडणुकीत पराभव करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
टीमने दिला धक्का : ओमी टीमच्या खेळीतून रामवानी यांची निवड झाली. शिवसेनेला धक्का बसला. ओमी टीम महायुतीवर भारी पडली आणि त्यांनी युतीला धक्का दिल्याचे मानले जाते.