ओमी कालानी भाजपात?

By Admin | Published: August 19, 2016 01:54 AM2016-08-19T01:54:51+5:302016-08-19T01:54:51+5:30

लोकसभा, विधानसभा, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन आपले बळ वाढविण्याचा कित्ता भाजपाने

Omi Kalaali BJP? | ओमी कालानी भाजपात?

ओमी कालानी भाजपात?

googlenewsNext

- सदानंद नाईक, उल्हासनगर

लोकसभा, विधानसभा, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन आपले बळ वाढविण्याचा कित्ता भाजपाने उल्हासनगरमध्येही गिरवला असून यावेळी त्यांनी थेट ओमी कालानी यांनाच पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीला खिंडार पाडताना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपाकडून आॅफर येत असल्याच्या वृत्ताला खुद्द ओमी यांनीच दुजोरा दिला असून भाजपच्या स्थानिक नेत्यांचाही त्याला विरोध नसल्याने पक्षप्रवेशाचा मार्ग निर्धोक बनला आहे. राज्यमंत्रीपदी संधी मिळालेल्या रवींद्र चव्हाण यांनीच यासाठी पुढाकार घेतला असून तो पूर्णत्त्वास जाईल, असा त्यांना विश्वास आहे.
राष्ट्रवादीत राहूनही ओमी टीम सध्या स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जपत काम करत आहे. त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. पालिकेच्या निवडणुका अवघ्या पाच महिन्यांनी होतील. शिवसेना-भाजपा युतीने गेले दशकभर उल्हासनगर पालिकेच्या सत्तेपासून कालानी दूर ठेवले. शहरात भाजपापेक्षा शिवसेना वरचढ आहे. कालानी यांना भाजपात प्रवेश दिल्यास पालिकेत भाजपाची स्थिती भरभक्कम होईल. सिंधी राजकारणावर पक्षाचा वरचष्मा होईल. राष्ट्रवादीत कालानी समर्थक २० नगरसेवक आहेत. तसेच काही अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबाही कालानी यांना आहे. त्यामुळे पक्षाचे स्थान बळकट करणे, सिंधी राजकारणावर कब्जा करणे आणि शिवसेनेला धडा शिकवण्याचे भाजपाचे मनसुबे एकाचवेळी पूर्ण होतील, याचा अंदाज आल्यानेच भाजपाने गळ टाकल्याची चर्चा आहे.
ओमी पालिका निवडणूक डोळ््यापुढे ठेवून सहा महिन्यांपूर्वी आपल्या ३० पेक्षा मोठ्या टीमची घोषणा केली. गेल्या आठवड्यात निवडणूक कोअर कमिटीही स्थापन केली. त्याच्या अध्यक्षपदी आमदार ज्योती कालानी आहेत. ज्योती आणि ओमी यांनी पप्पू कालानी यांच्यापासून दूर गेलेल्या-पण राजकारणावर, समाजकारणावर प्रभाव असलेल्या जुन्या-जाणत्या नेत्यांचे घर वापसी अभियान राबविले आहे. त्या हाकेला दर्शनसिंग लबाना, लक्ष्मण पमनानी, मोहन गोडो यांच्यासह अनेकांनी ओ दिल्याने ही टीम भक्कम झाली. पक्षातील नाराज नेत्यांसह नगरसेवकांनी ओमी टीमला सक्रीय पाठिंबा दिला आहे.
ओमी टीमला मिळणारा प्रतिसाद, ज्योती यांनी वेगवेगळ््या विषयांवर उठवलेले रान पाहूनच भाजपाने सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी त्यांना प्रवेशाची आॅफर दिल्याचे दिसते.

सेनेपेक्षा सरस स्थिती होण्याची शक्यता
सध्या पालिकेत शिवसेना २१, राष्ट्रवादी २० आणि भाजपा ११ असे पक्षीय बलाबल आहे. ज्योती कलानी आणि ओमी यांनी गेल्या काही काळात पक्षाचे बळ वाढवतानाच कलानी या नावाच्या करिष्म्याचा वापर करत आपले बळ पुन्हा एकत्र केले होते. पप्पू कालानी यांच्या चांगल्या कामांची पुण्याई वापरत त्यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले होते. त्यांचा राजकीय दबदबा कायम असल्याने कालानी जर भाजपामध्ये आले, तर शिवसेनेपेक्षा भाजपाचे स्थान मजबूत होईल, हे गृहीत धरून भाजपाने त्यांना आॅफर दिल्याचे समजते.

काम पाहूनच निर्णय
ओमी टीम शहरात सक्रीय आहे. आमच्या टीमचे काम पाहून भाजपाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रवेशाच्या आॅफर दिल्या आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या धोरणानुसार आमचे काम सुरू आहे. पण शहराचे हित पाहून योग्य वेळी निर्णय घेऊ.
- ओमी कालानी, राष्ट्रवादीचे युवा नेता आणि अपक्ष नगरसेवक

निर्णय हिताचाच
पक्षाच्या आदेशानुसारच भाजपाचे पदाधिकारी काम करतात. ओमी कालानी यांना वरिष्ठांनी पक्षात प्रवेश दिला, तर आम्ही कोणतीही नाराजी व्यक्त करणार नाही. वरिष्ठ नेते पक्षाच्या-शहराच्या हिताचाच निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे.
- कुमार आयलानी, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार

Web Title: Omi Kalaali BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.