ओमी कलानी व भाजप उल्हासनगरात आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 11:41 PM2020-11-18T23:41:34+5:302020-11-18T23:42:00+5:30
राजकारण तापले : नगरसेविकेचा मुलासह ओमी टीममध्ये प्रवेश
सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : भाजप नगरसेविका सरोजिनी टेकचंदानी व मुलगा राजेश यांनी ओमी कलानी टीममध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप व ओमी कलानी आमने-सामने आले आहेत. दरम्यान, टेकचंदानी यांनी पक्षाकडे राजीनामा दिला नसल्याने त्या भाजपात असल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असताना महापौर, उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापतीपद शिवसेना महाआघाडीकडे गेले आहे. विधानसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाला भाजपने उमेदवारी दिली नाही. याच्या निषेधार्थ भाजपमधील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराऐवजी शिवसेना व रिपाइंच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणले. तर, स्थायी समिती सभापती निवडणुकीत थेट भाजप बंडखोर समिती सदस्य विजय पाटील यांना शिवसेनेने सूचक, अनुमोदन देऊन निवडून आणले. या प्रकाराने भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान, भाजपचे युवा नेते व माजी नगरसेवक राजेश टेकचंदानी यांनी त्यांच्या आई व भाजपच्या नगरसेविका सरोजिनी टेकचंदानी यांच्यासह ओमी कलानी टीममध्ये प्रवेश केला. त्यांचे ओमी कलानी यांनी स्वागत केले.
महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना सत्ता गेल्याने आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष पुरस्वानी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. तसेच पुरस्वानी यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पक्षातूनच जोर पकडू लागला आहे.
भाजपमधील अनेक नगरसेवक संपर्कात असून नगरसेविका टेकचंदानी यांचा प्रवेश झांंकी है, अशी प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी देऊन भाजपला इशारा दिला.
महापालिका निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी असताना आतापासूनच निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. महापाैर, स्थायी समितीच्या निवडणुकीपासूनच भाजप व ओमी टीममध्ये वादाचे प्रसंग सुरु झाले आहेत.
शहर भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?
महापालिकेच्या इतिहासात भाजपचे १५ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले नाहीत. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजप व ओमी कलानी टीमची महाआघाडी झाल्यानेच भाजप महापालिकेत सत्तेपर्यंत पोहोचला. मात्र, यापुढे शहरात भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करू, अशी प्रतिक्रिया ओमी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी दिली आहे.