ओमी कलानी ‘साई’चरणी, महापालिकेचा तिढा सुटण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:03 AM2018-08-31T05:03:45+5:302018-08-31T05:04:09+5:30

महापौरपदाचा तिढा सुटेना : तारीख पे तारीख ने खदखदतोय असंतोष

Omi Kalani 'Sai Kanchani and the municipal corporation are ready for release | ओमी कलानी ‘साई’चरणी, महापालिकेचा तिढा सुटण्यासाठी साकडे

ओमी कलानी ‘साई’चरणी, महापालिकेचा तिढा सुटण्यासाठी साकडे

Next

उल्हासनगर : महापौरपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या ओमी टीमला भाजपा नेत्यांकडून तारीख पे तारीख मिळत असल्याने टीममध्ये असंतोष निर्माण झाला आहे. महापौरपद मिळावे, यासाठी साई पक्षप्रमुख जीवन इदनानी यांच्यासह इतर नगरसेवकांची मनधरणी करण्याची वेळ टीमवर आली आहे. टीमला महापौरपद मिळाले, तरी पालिकेत महाआघाडी कायम राहणार, अशी प्रतिक्रिया ओमी यांनी दिली आहे. दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मीना आयलानी राजीनामा देणार, असा दावा केला जात आहे.

उल्हासनगर पालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी भाजपाने शिवसेनेऐवजी ओमी टीमसोबत महाआघाडी केली. सत्तेसाठी नगरसेवक कमी पडताच एका रात्रीत साई पक्षाशी हातमिळवणी केली. तसेच साई पक्षाच्या सर्व अटीशर्ती मान्य केल्या. भाजपाला सव्वा वर्ष आणि ओमी टीमला सव्वा वर्ष महापौरपद देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले होते. त्यानुसार, भाजपाच्या मीना आयलानी महापौर झाल्या. त्यांच्या महापौरपदाला जुलै महिन्यात सव्वा वर्ष पूर्ण होताच ओमी टीमने महापौरपदाची मागणी केली. मात्र, आयलानी यांनी राजीनामा न दिल्याने त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला.

नागपूर अधिवेशनानंतर आयलानी यांना महापौरपदाचा राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर, पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी तशी माहिती दिली. अखेर, आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा आयुक्तांऐवजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयलानी आयुक्तांकडे राजीनामा देतील, अशी ओमी टीमला आशा आहे. महापौरपदासाठी साई पक्ष आडकाठी करत असल्याने ओमी टीम मनधरणी करत आहे.

पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा
पक्षाच्या आदेशानुसार मीना आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिला असल्याची प्रतिक्रिया शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. तर, महापालिकेमध्ये भाजपासोबत साई पक्षाची युती असल्याने भाजपाचा निर्णय अंतिम असेल, असे साई पक्षाचे प्रमुख व उपमहापौर जीवन इदनानी यांनी सांगितले.

आयलानी यांनाच महापौरपदी कायम ठेवा
शहर विकास आराखड्याची अंमलबजावणी, अर्धवट शहर विकासाची कामे, खेमानी नाला व भुयारी गटार योजना पूर्ण करणे, रस्ते योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी मीना आयलानी यांनाच महापौरपदी कायम ठेवा, अशी मागणी भाजपासह साई पक्षाच्या काही नगरसेवकांनी भाजपाच्या वरिष्ठांकडे केली असल्याची माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर काही नगरसेवकांनी दिली.

Web Title: Omi Kalani 'Sai Kanchani and the municipal corporation are ready for release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.