ओमी कलानींची साथसंगत आजपासून भाजपासोबत
By Admin | Published: January 28, 2017 02:49 AM2017-01-28T02:49:50+5:302017-01-28T02:49:50+5:30
‘देश बदल रहा है’ असे सांगत वेगवेगळ््या प्रवाहांना आपल्यासोबत सामावून घेणाऱ्या भाजपाच्या गंगेत अखेर ओमी टीमच्या राजकारणाचे घोडे
सदानंद नाईक / उल्हासनगर
‘देश बदल रहा है’ असे सांगत वेगवेगळ््या प्रवाहांना आपल्यासोबत सामावून घेणाऱ्या भाजपाच्या गंगेत अखेर ओमी टीमच्या राजकारणाचे घोडे न्हाऊन निघण्याची सर्व तयारी उल्हासनगरच्या गोल मैदानात पूर्ण झाली आहे. भाजपा, ओमी टीम आणि रिपाइंचा आठवले गट यांनी शनिवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करून शिवसेनेला धक्का देण्याची व्यूहरचना पूर्ण केली आहे. ज्या कलानी कुटुंबाशी असलेल्या संबंधांवरून भाजपाने एकेकाळी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे रान राज्यात पेटवले होते, त्याच भाजपाने अखेर उल्हासनगरच्या राजकारणात बस्तान बसवण्यासाठी कलानी कुटुंबाची साथ घेतली आहे.
कलानी यांना पक्षात प्रवेश देऊन निवडणूक लढवल्यास ज्या जागा वाढतील, त्या भाजपाच्या असतील, असा युक्तीवाद करत ओमी टीमला थेट पक्षात प्रवेश द्यावा असे भाजपातील एका गटाचे म्हणणे आहे. तर प्रवेशाला विरोध करणाऱ्या गटाला कलानी यांच्यासोबत फक्त आघाडी हवी आहे. कलानी यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व ठेवल्यास भविष्यात ते पक्षाला डोईजड होतील, त्यामुळे त्यांचा गट पक्षात सामावून घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, असाही मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे शनिवारी कलानी यांच्यासोबत आघाडीची घोषणा करायची की थेट प्रवेश द्यायचा यावर भाजपात अजून खल सुरू आहे. ‘आघाडी की प्रवेश’ असा प्रश्न ओमी कलानी यांना विचारला असता, त्यांनी ‘शनिवारी संध्याकाळी उत्तर मिळेल,’ एवढेच उत्तर दिले.
गेले तीन महिने ओमी यांच्यासाठी गळ टाकून बसलेल्या भाजपाने गेल्या आठवड्यात त्यांच्या प्रवेशाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. पक्षातील नाराजांची समजूत काढली आणि ज्या प्रकरणांमुळे ओमी वादग्रस्त ठरले होते, त्या प्रकरणांची धार भोथट करण्याचे सोपस्कारही पूर्ण झाले. मात्र अजूनही पक्षात सारे काही आलबेल नसल्याने हा प्रवेश लांबत गेला होता. तो आता शनिवारी, संध्याकाळी ७ वाजता होईल.
गोलमैदानातील कार्यक्रमासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, माजी आमदार कुमार आयलानी उपस्थित राहणार आहेत. ओमी यांची आई ज्योती या राष्ट्रवादीच्या आमदार असल्याने त्या सोहळ््यापासून दूर राहतील.