ओमी कलानी विरुद्ध भरत गंगोत्री आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:47 PM2019-02-11T23:47:27+5:302019-02-11T23:47:47+5:30

ओमी कलानींसह टीमच्या सदस्यांनी सुमन सचदेव यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याच्या आनंदात, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांच्या फोटोवर चिटर लिहून सोशल मीडियावर व्हायरल केले.

 Omi Kalani versus Bharat Gangotri face-to-face | ओमी कलानी विरुद्ध भरत गंगोत्री आमने-सामने

ओमी कलानी विरुद्ध भरत गंगोत्री आमने-सामने

Next

उल्हासनगर : ओमी कलानींसह टीमच्या सदस्यांनी सुमन सचदेव यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याच्या आनंदात, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांच्या फोटोवर चिटर लिहून सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबत, गंगोत्री यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हिललाइन पोलिसांनी ओमी कलानींसह चार जणांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या प्रकाराने ओमी कलानी विरुद्ध भरत गंगोत्री पुन्हा आमने-सामने आल्याने, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र-१७ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर भरत गंगोत्री, सुनीता बगाडे, पूजा कौर लभाना आणि सतरामदास जेसवानी हे निवडून आले. पूजा कौर लभाना यांची त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँगे्रसच्या जया साधवानी यांनी जातपडताळणी समितीकडे तक्रार केली असता, समितीने लभाना यांचे नगरसेवकपद अवैध ठरवले. त्यानुसार, प्रभाग क्र.-१७ मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. यावेळी गंगोत्री यांच्या उमेदवार सुमन सचदेव यांच्याविरोधात भाजपाने ओमी टीमच्या उमेदवाराला उभे केले. गंगोत्री यांच्याविरोधात भाजपा, ओमी टीम, साई पक्ष असा सामना रंगला. मतदानाच्या दिवशी हाणामारी होऊन अस्तित्वाच्या लढाईत गंगोत्री यांच्या सुमन सचदेव यांनी बाजी मारली. पोटनिवडणुकीत ओमी कलानी यांचे अस्तित्व पणला लागले होते; मात्र त्यांना यश मिळाले नाही.
राष्ट्रवादीच्या मात्र गंगोत्री गटाच्या सुमन सचदेव ओबीसी गटातून निवडून आल्या. त्यांनी ओमी टीमच्या मात्र भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या साक्षी पमनानी, काँगे्रसच्या जया साधवानी यांचा पराभव केला. जया साधवानी यांनी सुमन सचदेव यांच्याविरोधात जातपडताळणी समितीकडे धाव घेऊन सचदेव यांचे ओबीसी प्रमाणपत्र अवैध असल्याचा दावा केला.
त्यानुसार, जिल्हा जातपडताळणी समितीने सुमन सचदेव यांचे नगरसेवकपद रद्द ठरवल्याने, ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी, कमलेश निकम, सागर माखिजा व दीपा मनुजा यांनी गंगोत्री यांच्या फोटोवर चिटर लिहून सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला. गंगोत्री यांनी पोलिसांत धाव घेतल्यावर चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकाराने पुन्हा ओमी कलानी व गंगोत्री आमने-सामने आले असून आगामी पोटनिवडणुकीत याचे पडसाद उठणार असल्याचे बोलले जात आहे.

सुमन सचदेव
यांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा
जिल्हा जातपडताळणी समितीने सुमन सचदेव यांच्या ओबीसी जातप्रमाणपत्राची चौकशी करून, गेल्या आठवड्यात सचदेव यांचे नगरसेवकपद अवैध ठरवले. याविरोधात त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावून तक्रारदार जया साधवानी यांच्या जातप्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उभे केले.

Web Title:  Omi Kalani versus Bharat Gangotri face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.