विशेष समितीमध्ये मिळणार ओमी टीम समर्थक नगरसेवकांना सत्तेतील वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 03:37 PM2020-10-10T15:37:42+5:302020-10-10T15:37:51+5:30
उल्हासनगर महापालिका विशेष महासभा सोमवारी, कलानीसमोर भाजपा झुकली?
- सदानंद नाईक
उल्हासनगर : थेट मुख्यमंत्री यांच्याकडे भाजपने दाद मागितल्यावर महापौरांनी स्थगित केलेली विशेष महासभा सोमवारी बोलावली आहे. मात्र कलानी समर्थक नगरसेवकांना स्थायी ऐवजी विशेष समिती मध्ये सत्तेचा वाटा देण्याचे संकेत भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमणुदास पूरस्वानी यांनी दिले. एकूणच भाजप ओमी कलानी समोर झुकली का? या चर्चेला शहरात ऊत आला आहे.
उल्हासनगर महापालिका महापौर निवडणुकीत भाजपतील ओमी कलानी टीम समर्थक १० नगरसेवकांनी भाजप ऐवजी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौर पदी निवडून आणले. या सत्तांतरामूळे भाजपला जबर धक्का बसला. तर भाजप श्रेष्ठींनी शब्द देवून कलानी कुटुंबाला विधानसभेची उमेदवारी दिली नाही. याचा बदला घेतल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी त्यावेळी दिली होती. तेंव्हा पासून भाजपतील ओमी टीम समर्थक नगरसेवक शिवसेना सोबत होते. स्थायी व विशेष समिती मध्ये नगरसेवकांच्या संख्येनुसार भाजपचे बहुमत राहणार असल्याने, सत्तेतील वाटा मिळण्यासाठी ओमी टीम समर्थक पुन्हा भाजप मध्ये परतले. मात्र ओमी टीम समर्थक नगरसेवकांना स्थायी ऐवजी विशेष समिती मध्ये सत्तेचा वाटा देण्यात येणार आहे.
भाजपचे नेते रवींद्र चव्हाण व ओमी कलानी यांच्यात बैठक होऊन सन २०२१ पर्यंत भाजपा सोबत ओमी टीम एकत्र राहण्याचे ठरविण्यात आले. एका वर्षापूर्वी महापौर पद ज्या ओमी टीम समर्थक नगरसेवकांमुळे गमावण्याची वेळ भाजपवरील आली. त्याच नगरसेवकांना सत्तेतील वाटा देण्यासाठी भाजप श्रेष्ठी पुढे आल्याने, भाजपा ओमी कलानी टीम समोर झुकली का?. असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच भाजपच्या यू टर्न मुळे शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. सोमवारच्या विशेष महासभेत स्थायी समिती मध्ये भाजपचे कट्टर नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे. तर ९ पैकी ४ विशेष समिती व ४ पैकी २ प्रभाग समिती सभापती पद ओमी टीम समर्थक नगरसेवकांना देण्यात येणार आल्याची माहिती ओमी टीमचे प्रवक्ते कलमलेश निकम यांनी दिली आहे.
शिवसेनेची होणार कोंडी
महापालिकेत भाजपचे बहुमत असताना ओमी टीम समर्थक नगरसेवकां च्या बंडोखोरीने शिवसेनेच्या महापौर लीलाबाई अशान व उपमहापौर पदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आले आहे. ओमी टीम समर्थक नगरसेवक पुन्हा भाजपकडे गेल्याने, महासभेत सत्ताधारी शिवसेना अल्पमतात येवून भाजप नगरसेवक शिवसेनेची कोंडी करणार असल्याचे बोलले जात आहे.