ओमींचे आठवडाभरात भाजपात सीमोल्लंघन?
By admin | Published: October 7, 2016 05:19 AM2016-10-07T05:19:03+5:302016-10-07T05:19:03+5:30
मुंबई आणि ठाण्यात भाजपच्या जागा वाढल्या, तरी पूर्णपणाने सत्ता हाती येण्याची चिन्हे नसल्याने उल्हासनगरमध्ये ओमी कलानी आणि त्यांच्या टीमला
उल्हासनगर : मुंबई आणि ठाण्यात भाजपच्या जागा वाढल्या, तरी पूर्णपणाने सत्ता हाती येण्याची चिन्हे नसल्याने उल्हासनगरमध्ये ओमी कलानी आणि त्यांच्या टीमला सामावून घेत सत्ता संपादनाच्या दृष्टीने भाजपाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या देवदर्शन करीत असलेले ओमी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटतील आणि आठवडाभरात त्यांचे राजकीय सीमोल्लंघन होईल, असे समजते. फक्त ओमी यांना पक्षात प्रवेश द्यायचा की त्यांचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून युती करायची याबाबत भाजपा नेत्यांची चर्चा सुरू आहे. ती झाली की लगेचच सीमोल्लंघन होण्याची शक्यता आहे.
ओमी कलानींना प्रवेश देण्याबाबत स्थानिक पदाधिकारी मौन बाळगून असले तरी गेल्या आठवडयात पक्षातील एका गटाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवून ओमी टिमच्या प्रवेशामुळे भाजपाची शहरात ताकद वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रस्थापितांच्या एका गटाने विरोधाचा सूर लावला आहे. कोअर कमिटीच्या नावाखाली बैठक घेवून ओमी टीमच्या प्रवेशाला विरोध केला आहे. पण शत-प्रतिशत भाजपाच्या स्वप्नासाठी वरिष्ठ नेते त्यांच्या प्रवेशाला अनुकूल असल्याचे सांगितले जाते.
विरोधाचा ठराव कोअर कमिटीने मंजूर करून नेत्यांकडे पाठविल्याची माहिती शहराध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांनी दिली. तरीही ओमी टीमला प्रवेश देण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे ते म्हणाले.
शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी ओमी टीमची मदत होणार असल्याने प्त्या टीमला थेट पक्षात प्रवेश द्यायचा की त्यांच्या गटाशी युती करायची याबर चर्चा करीत आहेत. ओमींचा स्वतंत्र गट ठेवण्यापेक्षा त्यांना पक्षात घेतल्यास अधिक फायदा होईल, असे एका गटाचे म्हणणे आहे. पक्षाचे हे धोरण ठरत नसल्याने ओमी यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा लांबली आहे. ती दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.