चिन्हासाठी ओमी टीम छोट्या पक्षाच्या शोधात
By admin | Published: February 2, 2017 02:59 AM2017-02-02T02:59:06+5:302017-02-02T02:59:06+5:30
भाजपाने ओमी कलानी यांच्याशी आघाडी केली असल्याचे वरकरणी भासवले जात असले, तरी कलानी व त्यांच्या उमेदवारांनी ‘कमळ’ या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी,
- सदानंद नाईक, उल्हासनगर
भाजपाने ओमी कलानी यांच्याशी आघाडी केली असल्याचे वरकरणी भासवले जात असले, तरी कलानी व त्यांच्या उमेदवारांनी ‘कमळ’ या भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, याकरिता भाजपाचे नेते प्रयत्न करीत आहेत. खुद्द कलानी यांना आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यात रस आहे. त्यामुळे एखाद्या नोंदणीकृत पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याच्या विचारात कलानी आहेत.
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात राजकारणाचा गुन्हेगारीकरणाचा मुद्दा १९९० च्या दशकात तापवला होता. त्या वेळी मुंडे यांचे लक्ष्य पप्पू कलानी यांची उल्हासनगरातील झुंडशाही हे होते. मात्र, आता भाजपाने त्याच कलानी यांच्याशी आघाडी केली आहे. इतकेच नव्हे, तर उल्हासनगरात शिवसेनेला चारीमुंड्या चीत करण्याकरिता कलानी व त्यांच्या समर्थकांनी ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, याकरिता भाजपाचे नेते दबाव टाकत आहेत.
कलानी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ होते. आता ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवणे, याचा अर्थ स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व पुसून टाकण्यासारखे आहे, हे कलानी यांनी हेरले आहे. मात्र, सर्व उमेदवारांना एकसमान चिन्ह हवे असल्यास कमळ छातीशी कवटाळणे किंवा एखाद्या नोंदणीकृत छोट्या पक्षात प्रवेश करून त्याचे चिन्ह घेणे, हाच पर्याय कलानी यांच्यापुढे आहे.
पप्पू यांचे कट्टर समर्थक व मानसपुत्र जीवन इदनानी, साई बलराम, किशोर वनवारी, विनोद ठाकूर, सुरेश जाधव आदींनी त्यांच्यापासून फारकत घेऊन गंगाजल फ्रंट नावाची संघटना स्थापन केली. मात्र, निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना एकच चिन्ह मिळणार नसल्याने त्यांनी ऐन वेळेवर शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या ‘लोकभारती’ पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. ‘लोकभारती’चे सन २००७ च्या पालिका निवडणुकीत तब्बल १४ नगरसेवक निवडून आले होते. त्यांनी शिवसेना-भाजपासोबत युती करून महापौरपद पटकावले होते. तसेच २०१२ च्या निवडणुकीपूर्वी इदनानी यांनी स्वत:चा साई पक्ष स्थापन केला. पक्षाचे ९ नगरसेवक निवडून आल्यावर पुन्हा शिवसेना-भाजपासोबत युती करून महापौरपद मिळवले होते. आता ओमी कलानी यांनाही अशाच एखाद्या छोट्या नोंदणीकृत पक्षाचा आधार घ्यावा लागेल किंवा मग भाजपाचे ‘कमळ’ हाती घ्यावे लागेल.
‘कमळ’ चिन्हावर लढणार नाही : भाजपाच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार नाही. आमच्या टीमचे उमेदवार स्वतंत्र उभे राहणार असून सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळण्यासाठी राजकीय तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. नोंदणीकृत लहान पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा विचार केला जाऊ शकतो. - ओमी कलानी