Thane: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर सकल मराठ्यांच्यावतीने घोषणाबाजी, उपोषणाला परवानगी नाकारली
By जितेंद्र कालेकर | Published: October 27, 2023 11:13 PM2023-10-27T23:13:27+5:302023-10-27T23:14:23+5:30
Thane News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी एक मराठा, लाख मराठा.. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घाेषणाबाजी करण्यात आली.
- जितेंद्र कालेकर
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी एक मराठा, लाख मराठा.. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घाेषणाबाजी करण्यात आली. याठिकाणी साखळी उपोषणाला वागळे इस्टेट पोलिसांनी परवानगी नाकारली असून त्याऐवजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठाण्याचे अध्यक्ष रमेश आंब्रे यांना १४९ ची नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी ठाण्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाने एकत्र येत २८ ऑक्टाेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर परवानगी मागितली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील साखळी उपोषणाला वागळे इस्टेट पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्याशी चर्चा केली. चर्चेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषणास परवानगी मिळाल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जागेची पाहणी केली.
मनाई आदेशाचा भंग केल्यास कारवाई
दरम्यान, ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३१ आॅक्टोबरपर्यंत मनाई आदेश लागू असून पाच किंवा पाचपेक्षा एकत्र येत ष्घोषणाबाजी किंवा आंदोलनास मनाई आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या खाससगी निवाससनाबाहेरही आदोलनाला मनाई आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वागळे इस्टेट पोलिसांनी दिला आहे.