उल्हासनगर महापालिकेचा पर्यावरण दिनी एक अधिकारी, एक झाड संकल्प करून वृक्षारोपण
By सदानंद नाईक | Published: June 5, 2023 06:31 PM2023-06-05T18:31:08+5:302023-06-05T18:32:00+5:30
उल्हासनगर महापालिकेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला.
उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एक अधिकारी, कर्मचारी व एक झाड ही संकल्पना या वर्षांपासून राबविण्याचे आदेश दिले. सोमवारी त्यांनी वृक्षारोपण केले असून गेल्या वर्षी केलेले वृक्षारोपण मधील झाडे जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले.
उल्हासनगर महापालिकेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला. तसेच पर्यावरण संवर्धनाची त्यांनी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ दिली. यावेळी एसएसटी कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुळे पर्यावरणहानी बद्दल जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले. महापालिका मुख्यालयात वृक्षारोपण करून एक अधिकारी, कर्मचारी एक झाड या मोहिमेस आजपासून सुरुवात करण्यात केली असून झाड हे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख, प्रमुख कर्मचारी, मुकादम, लिपिक, वरिष्ठ लिपिक, अधीक्षक, स्वच्छता निरीक्षक, कर निरीक्षक आदीजन आपल्या नावाचे एक एक झाड लावणार असल्याचे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले.
महापालिका आयुक्तांनी एक अधिकारी, कर्मचारी एक झाड संकल्पना यावर्षापासून सुरू केले असून एका वर्षानंतर सदर झाडाची माहिती घेऊन त्याची नोंद गोपनीय अहवालात करण्यात येणार असल्याचे संकेतही आयुक्तांनी यावेळी दिले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जून महिन्यांमध्ये वृक्षारोपण करून त्याचे संरक्षण , जतन व संवर्धन करण्यासाठी निश्चयपूर्वक शपथ घेऊन वर्षभर त्याची अंमलबजावणी करणार आहे. पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, करूणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवडे, सुभाष जाधव, मुख्य लेखाधिकारी किरण भिलारे, मुख्य लेखापरीक्षक शरद देशमुख,आरोग्य विभाग प्रमुख मनिष हिवरे, अभियंता संदीप जाधव, पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत, उद्यान विभाग प्रमुख दिप्ती लादे, विनोद केणे आदीजन उपस्थित होते. तसेच त्यांनी महापालिका मुख्यालय प्रांगणात आपल्या नावाचे एकएका झाडाची लागवड केली. तसेच नाना नानी पार्क येथे महापालिकेच्या नर्सरीचे उद्घाटन करण्यात आले. रस्ता दुभाजकां मध्ये झाडे लावण्याचे काम नर्सरी करणार आहे.