११ जून रविवारी सायंकाळी ऐरोलीत घुमणार 'नादवेणू'चे पेटी व बासरीचे सूर; मोफत प्रवेश, संधी दवडू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 02:40 PM2023-06-10T14:40:44+5:302023-06-10T14:41:06+5:30
पावसाआधी ऐरोलीकर भिजणार नादवेणूच्या सुरांत, ११ जून रोजी होणाऱ्या सुरेल कार्यक्रमाची सविस्तर माहिती वाचा.
सध्या सगळेच जण पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. केरळमध्ये तर तो दाखल झाला आहेच, आता लवकरच महाराष्ट्रातही येण्याच्या तयारीत आहे. त्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर ऐरोलीत प्रथमच नादवेणू या संस्थेतर्फे 'नमोस्तुते' ही पेटी व बासरी वादनाची सुरेल मैफल होणार आहे. दिनांक ११ जून रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत श्रीमती जानकीबाई कृष्णा मढवी मंगल कार्यालय, प्लॉट नंबर १०, चिंचवली गार्डन, सेक्टर ५, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम होणार असून सर्वांना मोफत प्रवेश आहे.
नादवेणू संस्थेचे संचालक आकाश सूर्यवंशी आणि अंकिता सूर्यवंशी गेली अनेक वर्षे ऐरोली येते ऑफलाईन व ऑनलाईन बासरी व हार्मोनियमची शिकवणी घेत आहेत. सदर कार्यक्रमात हे दोन्ही शिक्षक आपल्या ५० बासरीवादक आणि १२ हार्मोनियम वादक विद्यार्थ्यांसह सुरेल गीतांनी मैफल सजवणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे, पंडित विवेक सोनार आणि तबला वादक आदित्य कल्याणपूर.
सदर कार्यक्रमाला रसिकांनी अवश्य उपस्थित राहा आणि सुरेल मैफिलीचा आनंद घ्या असे आवाहन आकाश सूर्यवंशी यांनी केले आहे.