दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आगीच्या ११ घटना, फटाक्यांमुळे घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 04:13 PM2022-10-25T16:13:12+5:302022-10-25T16:14:03+5:30
दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाके फोडून मोठया प्रमाणात जल्लोषात साजरी केली गेली
ठाणे : शहरात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तब्बल अकरा आगीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये फटाक्यांमुळे इतकी घटना समोर आल्या असून फटाक्यांमुळे लागलेल्या आगी या किरकोळ स्वरूपाच्या असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. एकीकडे या घटना समोर येत असताना, दुसरीकडे एका बोगस कॉलने आपत्ती आणि अग्निशमन दलाची चांगली दमछाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटाके फोडून मोठया प्रमाणात जल्लोषात साजरी केली गेली. लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशी असल्याने या दिवसात मोठी आगीची घटना जरी घडली नसली तरी लहान ( किरकोळ) आगीच्या घटना समोर आल्या आहेत. विवियाना मॉल जवळ, स्कायवॉकच्या बाजूला कचऱ्याला आग लागली होती. महात्मा फुलेनगर येथील आई माता मंदिर जवळ, सचिन तेंडुलकर स्टेडियमच्या बाजुला झाडाला आग लागली होती.खोपट येथील जानकी आनंद सोसायटी जवळ, शिवसेना शाखेच्या बाजूला झाडाला आग लागली होती. कळवा,खारेगाव येथील इमारत क्रमांक- १४, आनंद विहार कॉम्प्लेक्स, खारेगाव नाका येथे इमारतीच्या सहाव्या मजल्यावरती असेलल्या विंडोच्या कबूतर जळीला आग लागली होती.मुल्लाबाग, निळकंठ ग्रीन, येथे फेमिगो इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील रूम क्रमांक-२००२ मध्ये वॉशिंग मशिनच्या युनिटला आग लागली होती. कळवा येथील सायबा हॉल, तरण तलाव जवळ, गेट क्रमांक-०१ च्या बाजुला पत्र्याच्या शेडवरती असलेल्या प्लॅस्टिकला आग लागली होती.कळवा,खारेगाव येथील ९०-फीट रोड, पारसिक नगर येथे झाडाला आग लागली होती.पोखरण रोड क्रमांक-०१ येथील कोर्ट-यार्ड सोसायटी जवळ, रोझाना टॉवरच्या बाजूला, इमारतीच्या २८-व्या मजल्यावरील गॅलरीत असेलल्या कचऱ्याला आग लागली होती. कोपरीत साई नगरी सोसायटी, चेंदनी कोळीवाडा, येथे झाडाला आग लागली. ठाणे रेल्वे स्टेशन प्लॉटफॉर्म क्रमांक-०१ समोर, दादा पाटीलवाडी, बी-कॅबीन, येथे वर्स- स्टाईल फिटनेस जीममध्ये आग लागली होती. तसेच ठाणे स्टेशन रोड, प्रभात सिनेमा जवळ येथे जय हिंद कलेक्शन या दुकानाच्या छतावरती असलेल्या प्लॅस्टिक ताडपत्रीला आग लागली होती. या लागल्या आगी किरकोळ स्वरूपाच्या असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.