ठाण्यातील नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी ९ हजार तरूणांची निवड
By सुरेश लोखंडे | Published: March 7, 2024 04:11 PM2024-03-07T16:11:33+5:302024-03-07T16:12:30+5:30
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने हा“नमो महारोजगार” मेळाव्याचे दाेन दिवशीय आयाेजन केले होते.
ठाणे : येथील मॉडेला मिल कपाऊंडमध्ये पार पडलेल्या ‘नमो महारोजगार’ मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतरच्या पहिल्याच दिवशी २१ हजार १६६ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असता त्यापैकी आठ हजार २१० उमेदवारांची प्राथमिक निवड झाली तर अंतिम निवड तब्बल एक हजार १४० उमेदवारांची झाली आहे. या नऊ हजार युवकांची निवड झाल्यामुळे सुशिक्षित युवा, युवतींमध्ये आनंदाेत्सव व्यक्त हाेत आहे.
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने हा“नमो महारोजगार” मेळाव्याचे दाेन दिवशीय आयाेजन केले असता गुरूवारी त्याची सांगता झाली. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या. या मेळाव्यासाठी एकूण ६१ हजार ८०५ उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. उमेदवारांच्या तिथेच मुलाखती घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मेळाव्यातील २९८ उद्योजकांच्या उपस्थितीत पहिल्याच दिवशी २१ हजार १६६ उमेदवारांची मुलाखती झाल्या. त्यापैकी आठ हजार २१० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. तर एक हजार १४० उमेद्वारांची अंतिम निवड करण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दिलीप पवार यांनी दिली.
या मेळाव्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय रविंद्र सामंत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार किसन कथोरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव, ओम प्रकाश गुप्ता, कौशल्य विकास आयुक्तालयाच्या आयुक्त निधी चौधरी, कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर, भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, दिपक चव्हाण, विकास गजरे, उर्मिला पाटील आदि उपस्थित होते.