युपीच्या धर्तीवर महाराष्ट्रात तृतीय पंथीयसाठी कल्याण महामंडळ बनणार - आ. सरनाईक
By धीरज परब | Published: September 12, 2022 08:37 PM2022-09-12T20:37:26+5:302022-09-12T20:37:47+5:30
राज्यात तृतीयपंथी यांच्या विविध समस्या आहेत. तृतीयपंथीयांना समाजाकडून उपेक्षित वाईट वागणूक मिळते.
मीरारोड - उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी ' तृतीयपंथी कल्याण महामंडळ ' स्थापन करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
राज्यात तृतीयपंथी यांच्या विविध समस्या आहेत. तृतीयपंथीयांना समाजाकडून उपेक्षित वाईट वागणूक मिळते. त्यांना शिक्षण , रोजगार वा व्यवसाय मध्ये स्थान दिले जात नसल्याने नाईलाजाने भीक मागण्याशिवाय त्यांच्या कडे पर्याय नसतो. त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालये नसल्याने त्यांची कुचंबणा होते. सरकारी नोकऱ्यां मध्ये आरक्षण, पोलीस ठाण्यात स्वतंत्र सेल, रेल्वेगाडीत महिलांसाठी असते तशी त्यांच्यासाठी स्वतंत्र बोगी, सरकारी अर्जामध्ये स्त्री, पुरूष याप्रमाणेच किन्नर असा तिसरा कॉलम असावा, यासह रोजगार, घर, शिक्षण आदी बाबतच्या त्यांच्या अनेक मागण्या संघटनाच्या वतीने केल्या जात आहेत या कडे आ . सरनाईक यांनी लक्ष वेधले.
तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने ’उत्तर प्रदेश किन्नर कल्याण मंडळाची“ स्थापना केली आहे . त्याच धर्तीवर किन्नरांच्या कल्याण व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे शिक्षण, रोजगार, घर योजनांसाठी महाराष्ट्रात सुद्धा ’किन्नर कल्याण महामंडळ“ स्थापन होणे आवश्यक आहे. किन्नरांच्या मागण्या व त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कृती आराखडा बनविणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे यासाठी समाज कल्याण खात्याच्या अंतर्गत महामंडळाची गरज असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते असे आ. सरनाईक म्हणाले .