दहीहंडीच्या निमित्ताने निवडणूक प्रचाराचा नारळ आज फुटणार?; शक्तिप्रदर्शन हाेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:00 AM2023-09-07T07:00:58+5:302023-09-07T07:01:43+5:30

मुदतपूर्व निवडणुकीची हंडी आणि मतांचे लोणी : शक्तिप्रदर्शन हाेणार

On the occasion of Dahi Handi, the coconut of election campaign will burst today? | दहीहंडीच्या निमित्ताने निवडणूक प्रचाराचा नारळ आज फुटणार?; शक्तिप्रदर्शन हाेणार

दहीहंडीच्या निमित्ताने निवडणूक प्रचाराचा नारळ आज फुटणार?; शक्तिप्रदर्शन हाेणार

googlenewsNext

ठाणे : देशात मुदतपूर्व निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी ठाण्यात रंगणाऱ्या दहीहंडी उत्सवातील थरांचा थरार पाहण्याकरिता आणि यानिमित्ताने मतांचे लोणी आपल्याच पक्षाच्या पदरात पाडून घेण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिवसभरात ठाण्यात पायधूळ झाडणार आहेत. दहीहंडीकरिता लाखो युवक-युवती रस्त्यावर उतरणार असल्याने निवडणूक प्रचाराचा जणू नारळ गुरुवारी फोडला जाणार आहे. 

मंगळवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामे नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. कामाचे कार्यादेश निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी देण्यास सांगितले. निवडणुकीच्या कामाचा फटका कोणत्याही विकासकामांना बसणार नाही, याची दखल घेऊन कामांचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. देसाई यांच्या या स्पष्ट आदेशांमुळे डिसेंबरनंतर लोकसभा निवडणुका लागण्याचे संकेत मिळाले. 

ठाण्यात सत्ताधारी आणि विरोधकांची हजेरी

मुख्यमंत्री शिंदे हे टेंभी नाक्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उभारलेल्या प्रत्येक हंडीच्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तसेच शंभुराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे यांच्यासह इतर मंत्रीदेखील ठाण्यात हजेरी लावणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अरविंद सावंत आदींसह इतर मान्यवर ठाण्यातील निष्ठेच्या हंडीला हजेरी लावून मतदारांकडे मतांचा जोगवा मागणार आहेत. यंदा ठाण्यात टेंभी नाक्यावर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ हंडी आहे, तर  हाकेच्या अंतरावर निष्ठेची अर्थात ठाकरे गटाची हंडी उभारली जाणार आहे. दोन्हीकडे हिंदुत्वाचा जागर केला जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

सर्वाधिक मोठ्या, मानाच्या हंड्या ठाणे शहरात 
‘एक देश, एक निवडणूक’ या दिशेने केंद्राची पावले पडत असतील तर विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांसोबत होणार का, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे आता दहीहंडीचा सोहळा ही सर्वच राजकीय पक्षांकरिता मतांची बेगमी करण्याची संधी आहे. राज्यातील सर्वाधिक मोठ्या आणि मानाच्या हंड्या ठाणे शहरात आयोजित केल्या जातात. त्यामुळे जोरदार तयारी सुरू आहे.

पालकमंत्र्यांनी निवडणुकीचे संकेत दिल्यानंतर ठाणे महापालिका कामाला लागली आहे. मंगळवारपासून पालिकेत दिवसभर बैठका सुरू होत्या. रस्त्यांची, सुशोभीकरणासह इतर सुरू असलेली कामे पूर्ण करण्याबरोबर प्रस्तावित कामांचे कार्यादेश देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी केल्याची माहिती आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन प्रस्तावित कामांच्या याद्या बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

Web Title: On the occasion of Dahi Handi, the coconut of election campaign will burst today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.