ऐन दिवाळीत कचऱ्याचे ढीग; स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी अभियानाला हरताळ
By सदानंद नाईक | Published: November 8, 2023 06:21 PM2023-11-08T18:21:46+5:302023-11-08T18:25:01+5:30
उल्हासनगर महापालिकेने कचरा उकलण्याचा ठेका गेल्या वर्षी दुप्पट किंमतीला देऊनही कचऱ्याचे ढिग शहरातील विविध विभागात साचल्याचे चित्र दिसून येत आहे.
उल्हासनगर : शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असूनही ऐन दिवाळीत शहरतील विविध विभागात कचऱ्याचे ढिग साचले आहे. कचऱ्याचे ढीग साचल्याने, नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांच्याशी संपर्क साधला असता झाला नाही.
उल्हासनगर महापालिकेने कचरा उकलण्याचा ठेका गेल्या वर्षी दुप्पट किंमतीला देऊनही कचऱ्याचे ढिग शहरातील विविध विभागात साचल्याचे चित्र आहे. कचरा उचलण्याचा ठेका दुप्पट किंमतीला देऊन शहर कचरा मुक्त अशी घोषणा महापालिकेकडून केली होती. मात्र त्या घोषणेला ठेकेदार हरताळ फासत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. कचऱ्याचे ढिग साचल्यानंतर आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने, महापालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यात साठेलोठे असल्याची टीकाही होत आहे. कॅम्प नं-४ येथील हिंदू स्मशानभूमी समोर दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान अर्ध्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आले. असेच वातावरण अन्य विभागात असून नागरिकांना येता-जातांना दुर्गंधीमुळे हाताने नाक दाबावे लागत आहे.
साफसफाई खाजगीकरणावर ठेका वादात?
महापालिकेने शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील साफसफाईचे खाजगीकरण प्रायोगिकतत्वावर केले. यापोटी महापालिका वर्षाला ११ कोटी खर्च करणार आहे. मात्र साफसफाईचे खाजगीकरण केलेल्या प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील सफाई बाबत नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक रहिवासी व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी खाजगीकरण केलेल्या प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील साफसफाईवर प्रश्न उभे केले आहे. यामुळे साफसफाई खाजगीकरणाला वाढता विरोध होत आहे.