जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त उल्हासनगर महापालिकेने ९ प्रजातींचे तयार केले २५०० बीजगोळे
By सदानंद नाईक | Published: July 28, 2023 05:39 PM2023-07-28T17:39:13+5:302023-07-28T17:39:13+5:30
शहरातील खुल्या जागा, उद्यान, मैदान, डम्पिंग ग्राऊंड आदी ठिकाणी बीजगोळे फेकून देऊन त्याठिकाणी नवीन झाडे निर्माण होणार आहे.
उल्हासनगर : जागतिक निसर्ग संवर्धनानिमित्त महापालिकेने वेगवेगळ्या ९ प्रजातीच्या झाडाचे २ हजार ५०० बीजगोळे तयार केले. शहरातील खुल्या जागा, उद्यान, मैदान, डम्पिंग ग्राऊंड आदी ठिकाणी बीजगोळे फेकून देऊन त्याठिकाणी नवीन झाडे निर्माण होणार आहे.
उल्हासनगर महापालिका उद्यान विभाग व शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून, २ हजार ५०० बीजगोळे तयार केल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे व उद्यान अधिक्षका दीप्ती पवार यांनी दिली आहे. तयार करण्यात आलेल्या सीड बॉल्स मध्ये माती व सेंद्रिय खताचा समावेश करून, त्यात लावावयाच्या झाडाचे बी टाकून त्याचा गोळा बनवला जातो. तो गोळा पावसाळ्यात मोकळ्या जागेत पडीक जागेत टाकून त्यापासून पावसाच्या पाण्यातून नैसर्गिक पद्धतीने झाडांची वाढ होते ही झाडे नैसर्गिक पद्धतीने वाढत असल्यामुळे झाडे टिकून राहतात.
महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व करुणा जुईकर यांच्या नियंत्रणाखाली उद्यान व शिक्षण विभाग यांनीं संयुक्तपणे उपक्रम राबविला जात आहे. महापालिकेच्या मिडटाऊन हॉल येथे कर्मचाऱ्यांचे सीड बॉल्स तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. जास्तीत जास्त सीड बॉलस करून निसर्गात ते टाकून त्यापासून झाडे वाढण्यासाठी महापालिकेचा हा प्रयोग नक्कीच स्तुत्य असल्याचे उपायुक्त नाईकवाडे म्हणाले. या प्रशिक्षणा दरम्यान अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे महत्त्व व नागरिकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. सीड बॉल्स तयार करण्याच्या प्रशिक्षणाची नियोजन उद्यान विभाग अधीक्षक दीप्ती लादे यांनी केले. यावेळी विधी अधिकारी राजा बुलानी, भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे व शेकडो कर्मचारी उपस्थित होते.