भिवंडीत पेट्रोल पंप मिळवून देण्याच्या बहाण्याने त्रिकुटाने घातला ४१ लाखांचा गंडा
By नितीन पंडित | Published: January 18, 2024 06:25 PM2024-01-18T18:25:00+5:302024-01-18T18:25:09+5:30
शहरातील मानसरोवर येथील इमारती मध्ये राहणारे कापड व्यवसायिक राजकुमार महेंद्र ठाकुर,वय २३ वर्षे असे फसवणूक झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.
भिवंडी :इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड मधून नवीन पेट्रोल पंप मिळवून देतो असे सांगत विश्वास संपादन करून शहरातील एका व्यवसायिकास त्रिकुटाने ४१ लाख ४९ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
शहरातील मानसरोवर येथील इमारती मध्ये राहणारे कापड व्यवसायिक राजकुमार महेंद्र ठाकुर,वय २३ वर्षे असे फसवणूक झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांच्याशी वरून जैस्वाल, मनोज शर्मा व अमित या तिघांनी आपल्या मोबाईल वरुन संपर्क साधत आपण इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड मधून बोलत असल्याचे सांगून त्यांनी नवीन पेट्रोलपंप उघडण्याकरीता नोंदणी फी,सुरक्षा अनामत रक्कम,परवाना फी व यंत्र सामुग्री इत्यादी साठी वेळोवेळी पैशांची मागणी केल्याने व तसा ई मेल इंडीयन ऑईल कॉर्पोरशन लिमीटेडचे ई मेल वरून करून व्यवसायिक राजकुमार ठाकुर यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर राजकुमार ठाकुर यांनी आपल्या वडिलांच्या बँक खात्यातून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बांद्रा मुंबई येथील तीन वेगवेगळ्या बँक खात्यात १३ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ या महिन्याभरा च्या काळात ४१ लाख ४९ हजार रुपये नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पाठविले. त्यानंतर त्रिकुटा कडून संपर्क टाळला जात असल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने राजकुमार ठाकुर यांनी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.