शाळेच्या पहिल्याच दिवशी अंदाजे १ हजार विद्यार्थ्यांनी महापालिका शाळेत घेतला प्रवेश
By धीरज परब | Published: June 15, 2023 06:35 PM2023-06-15T18:35:48+5:302023-06-15T18:36:05+5:30
आयुक्त यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न
भाईंदर - १५ जून रोजी सकाळी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत महापालिका शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेच्या पहिल्याच दिवशी अंदाजे १ हजार विद्यार्थ्यांनी महापालिका शाळेत प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांना मोफत वह्या - पुस्तके, गणवेश, दप्तर, वॉटर बॉटल, बूट आदी आयुक्तांच्या हस्ते देण्यात आले.
शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ उर्दू शाळा, मिरा गाव उर्दू शाळा क्र. ३२, महानगरपालिका उद्यान शेजारी येथे आयोजित करण्यात आला होता. आयुक्त यांनी पेणकरपाडा शाळेस भेट दिली. नव्या शैक्षणिक वर्षात पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत या कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड व संजय शिंदे, शहर अभियंता दिपक खांबित, शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, सहाय्यक आयुक्त संजय दोंदे आदी उपस्थित होते.
आयुक्त व अधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, वॉटर बॉटल, बूट, दप्तर, मोजे इत्यादी उपयुक्त वस्तूंचे वाटप करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शाळेच्या पहिल्याच दिवशी आयुक्त यांच्या हस्ते डिजिटल स्वरूपात सुरू करण्यात येणाऱ्या वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी अंदाजे १ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या शाळेत नव्याने प्रवेश घेत आपल्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात केली. महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांनी रांगा लावल्या आहेत. यंदाच्या वर्षी १० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढेल अशी आशा पालिकेला आहे.
नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा गणवेश पॅटर्न बदलण्यात आला असून शिक्षकांनासुद्धा कोटच्या स्वरूपात गणवेश देण्यात आला आहे.
महापालिका शाळा तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी कला क्रीडा स्पर्धा, परीक्षा स्पर्धा तयारी तसेच इतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम शिक्षक करत आहेत. विद्यार्थ्यांना देश विदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सर्व मुख्याध्यापक, शिक्षक करतील अशी अपेक्षा आयुक्त दिलीप ढोले यांनी व्यक्त केली.