बुधवारी ठाणेकरांची सावली गायब होणार, शून्य सावलीचा दिवस उजाडणार
By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 14, 2023 03:47 PM2023-05-14T15:47:47+5:302023-05-14T15:57:23+5:30
बुधवार, १७ मे रोजी मध्यान्ही ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे.
ठाणे : आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही असं म्हटलं जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘ शून्य सावलीचा दिवस ‘ असे म्हटले जाते.
बुधवार, १७ मे रोजी मध्यान्ही ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. बुधवार १७ मे रोजी दुपारी १२ वाजता घंटाळी मैदान नौपाडा ठाणे येथे मराठी विज्ञान परिषदेतर्फे शून्य सावलीचे प्रात्यक्षिक दाखवून संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण व कार्यवाह प्रा. ना. द. मांडगे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील काही ठिकाणचे शून्य सावलीचे दिवस
(१) रत्नागिरी ११ मे (२) सातारा, सोलापूर १२ मे (३) धाराशिव १३ मे (४) रायगड, पुणे, लातूर १४ मे, (५) अंबेजोगाई, केज १५ मे (६) मुंबई, नगर, परभणी, नांदेड १६ मे (७) ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याण , पैठण १७ मे (८)संभाजीनगर , जालना, हिंगोली, चंद्रपूर १९ मे (९) नाशिक, वाशीम, गडचिरोली २० मे (१०) बुलढाणा, यवतमाळ २१ मे (११) वर्धा २२ मे (१२) धुळे, अकोला, अमरावती २३ मे (१३) भुसावळ , जळगांव, नागपूर २४ मे (१४) नंदुरबार २५ मे या दिवशी शून्य सावली योग आहे.
करावयाचे प्रयोग
शून्य सावली दिसण्याच्या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायला सुरुवात करावी. पुठ्याचे एक जाड नळकांडे तयार करून उन्हांत ठेवावे. किंवा एक जाड काठी उन्हात उभी करून ठेवावी. तिच्या सावलीचे निरीक्षण करावे. काठीच्या सावलीची लांबी कमीकमी होत जाईल. ठीक १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य आकाशात डोक्यावर आला म्हणजे सावली काठीच्या मुळाशी आल्यामुळे अदृश्य होईल. नंतर पुन्हा काठीची सावली लांब लांब होत जाईल. मुलांच्य एका गटाने उन्हात गोलाकार उभे राहून एकमेकांचे हात धरून कडे करावे. नंतर सावलीचे निरीक्षण करावे. आकाशात सूर्य डोक्यावर आल्यानंतर सुंदर दृश्य दिसेल. याचा उंचावरून फोटो घेता येईल.