बॅनरबाजीतून पुन्हा एकदा राजकीय शक्तीप्रदर्शन, पालिकेचा कानाडोळा
By अजित मांडके | Published: January 19, 2024 02:52 PM2024-01-19T14:52:17+5:302024-01-19T14:53:13+5:30
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून अनाधिकृत बॅनर पोस्टरवर कारवाई केली जात असल्याचे दिसत होते.
ठाणे : संपूर्ण देश सध्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राम मय झाला आहे. ठाण्यातही सध्या तसेच वातावरण दिसत आहे. परंतु ठाण्यात या निमित्ताने पुन्हा एकदा बॅनरबाजीला उत आल्याचे चित्र शहरभर दिसत आहे. एकीकडे स्वच्छ ठाण्याचा नारा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र बॅनरबाजीने पुन्हा एकदा शहरातील महत्वाचे चौक, रस्ते, अगदी नव्याने रंग मारण्यात आलेल्या मेट्रोच्या पिलरवर देखील पुन्हा बॅनरबाजीतून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयाच्या समोरच जेथून आयुक्त व पालिकेचे इतर पदाधिकारी रोजच्या रोज ये जा करीत असतात, त्या परिसराला देखील बॅनरबाजीचा विळखा पडल्याचे चित्र आहे. परंतु या बॅनरबाजीकडे महापालिकेने जणू कानाडोळाच केला असल्याचे चित्र दिसत आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून अनाधिकृत बॅनर पोस्टरवर कारवाई केली जात असल्याचे दिसत होते. परंतु तो केवळ फार्स असल्याचेच स्पष्ट झाले आहे. ठाण्यातील एकही रस्ता एकही चौक आज मोकळा श्वास घेतांना दिसत नाही. महापालिका मुख्यालयाच्या समोर कोणी भावी आमदाराचे बॅनर लावले आहेत, तर कोणी रामलल्लाचे बॅनर लावून शक्ती प्रदर्शन केले आहे. महापालिका मुख्यालयाजवळच कॉमन मॅनचा एक चौक आहे. परंतु आजच्या घडीला तो कॉमन मॅनही बॅनरबाजीच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. दुसरीकडे कॅसलमिल नाका येथील चौक, जांभळी नाका येथील चिंतामणी चौक आदींसह शहरातील इतर चौकही सध्या बॅनरबाजीने पुर्ते रंगले आहेत.
महापालिकेच्या माध्यमातून चौक सुशोभिकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यानुसार काही चौकांनी एक वेगळी झळाळी मिळाली होती. परंतु आज ते चौकही या बॅनरबाजीच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. तिकडे शहरातील प्रमुख रस्त्यांवर ते अगदी गल्ली बोळातही सध्या बॅनरबाजीला उत आल्याचे चित्र आहे.
मेट्रोचे पिलर पुन्हा विद्रुप
मागील महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर विद्रुप होणार नाही, या दृष्टीने उपाय योजना कराव्यात, तसेच मेट्रोच्या पिलरवर होणाºया जाहीरातीबाजीच्या विरोधात देखील नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व रस्त्यांवरील चौकातील बॅनर फलक काढले होते. तसेच मेट्रोचे पिलर देखील जाहीरातबाजी मुक्त केले होते. त्यानंतर मेट्रोच्या पिलरला रंग मारण्यात आला होता. परंतु त्याला काही दिवस जात नाही तोच पुन्हा या पिलरवर देखील राजकीय आखाडा रंगल्याचे चित्र आहे. पुन्हा पिलरवर बॅनरबाजी करण्यात येऊन पिलर विद्रुप करण्यात आले आहेत.
महापालिकेची डोळे झाक
अनाधिकृत बॅनर, फलकांच्या विरोधात महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार प्रत्येक बुधवारी बॅनर, फलकवर कारवाई केली जाईल असे आश्वासन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. परंतु आता बुधवार उलटून गेला तरी देखील शहरातील बॅनरवर कारवाई झालेली दिसून आलेली नाही. उलट बॅनरबाजीच्या प्रमाणात आणखी वाढ झाल्याचे चित्र आहे. मुख्यालयासमोरील बॅनरवर देखील महापालिकेला कारवाई करता आलेली नाही. त्यामुळे महापालिका याकडे कानाडोळा करते का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.