अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा जखमी रेल्वे प्रवाशाकडे दुर्लक्ष; रुग्णवाहिकेअभावे उपचारासाठी विलंब
By पंकज पाटील | Published: April 8, 2023 06:13 PM2023-04-08T18:13:22+5:302023-04-08T18:13:57+5:30
दोन महिन्यांपूर्वी अंबरनाथ रेल्वे स्थानकात जखमी अवस्थेत असलेल्या दिव्या जाधव तरुणीला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे शुक्रवारी रात्री दहा वाजून 45 मिनिटांनी एका तरुणाचा रेल्वेतून पडून अपघात घडला या तरुणाला तब्बल अर्धा तास उपचाराविना स्थानकात तडफडत ठेवण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वी अंबरनाथ रेल्वे स्थानकात जखमी अवस्थेत असलेल्या दिव्या जाधव तरुणीला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेतून रेल्वे प्रशासनाने कोणताही बोध घेतलेला नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. शुक्रवारी रात्री अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलमधून पडलेला मसीहा जोसफ (१९) हा तरुण जखमी अवस्थेत तडफडत होता. त्या तरुणाला उचलून रेल्वे स्थानकात आणण्यासाठी देखील रेल्वे प्रशासनाने बराच विलंब लावला. उपचारासाठी तडपणाऱ्या या तरुणाला रेल्वे आणि पोलिसांच्या पंचनाम्याला सामोरे जावे लागले. रेल्वे प्रशासनाच्या या कामाच्या प्रवृत्तीमुळे रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना योग्य वेळी उपचार मिळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर १०८ रुग्णवाहिका तैनात केली होती. काही दिवस १०८ रुग्णवाहिकाही अंबरनाथ स्थानकाबाहेर दिसली. मात्र त्यानंतर रुग्णवाहिकेची सेवा बंद झाली असून वन रुपी क्लिनिकही बंद झाले आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी जखमींची मोठी फरपट होताना दिसत आहे. शुक्रवारी ज्या तरुणाचा रेल्वे अपघात घडला त्यासंदर्भात स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी रेल्वे प्रशासनाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे प्रशासनाने आमदारांच्या कॉलला देखील कोणताही प्रतिसाद दिला नाही. याबाबत खुद्द आमदार कीणीकर यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केलीये. दरम्यान रेल्वेच्या नोंदवहीमध्ये हा अपघात 10:46 मिनिटांनी घडला असून ११.१५ मिनिटांनी म्हणजे तब्बल अर्धा तासानंतर रुग्णवाहिका आल्याची नोंद देखील करण्यात आली आहे.