परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील एका आरोपीचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:21 PM2021-08-02T21:21:20+5:302021-08-02T21:23:20+5:30
ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयातील सुनिल देसाई या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने ठाणे न्यायालयात जामीनासाठी सोमवारी अर्ज केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयातील सुनिल देसाई या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने ठाणे न्यायालयात जामीनासाठी सोमवारी अर्ज केला. याच अर्जाची सुनावणी येत्या ९ आॅगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, परमबीर यांच्यासह सर्वच आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाईची मागणी पोलिसांकडे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना आणि साक्षीदार क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, तत्कालीन पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आणि निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्यासह २८ जणांविरुद्ध खंडणी उकळल्याची तक्रार दाखल केली आहे. मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करुन त्यातून सुटकेसाठी आणि पोलिसांचा मार वाचविण्यासाठी एक कोटी १८ लाखांची मागणी करुन तत्कालीन निरीक्षक शर्मा यांनी ते स्वीकारल्याचा आरोप केतन यांनी केला आहे.
या प्रकरणातील विकास दाभाडे आणि सुनील देसाई या दोन कथित आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी २ आॅगस्ट रोजी अर्ज केला. मात्र, दाभाडे याने काही वेळातच आपला अटकपूर्व अर्ज परत घेतला. तर देसाई यांच्या अर्जावर न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. या अर्जावर पोलिसांचे म्हणणे मागविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेत आरोपी असलेल्या आठ पोलीस अधिकाऱ्यांसह २८ आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी सह पोलीस आयुक्तांकडे केली जाणार असल्याची माहिती अॅड. सागर कदम यांनी दिली.