ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगली एकांकिका : प्रश्न कायद्याचा आहे, अनेकविध सादरीकरणांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:16 PM2017-12-11T16:16:33+5:302017-12-11T16:29:52+5:30
३५४ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर ‘प्रश्न कायद्याचा आहे’ ही एकांकिका रंगली. यावेळी अनेकविध सादरीकरणांची रेलचेल प्रेक्षकांनी अनुभवली.
ठाणे: रविवारची संध्याकाळ ठाणे रसिकांसाठी लक्षणीय ठरली ती ३५४ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यामुळे. या कट्ट्यावर एकपात्री, शेरोशायरी, एकांकिका अशा अनेकविध सादरीकरणांची रेलचेल होती. तसेच, शेवटी सादर झालेली ‘प्रश्न कायद्याचा आहे’ ही एकांकिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली.
३५४ क्रमांकाच्या कट्ट्याचा विशेष भाग म्हणजे ‘प्रश्न कायद्याचा आहे’ ही एकांकिका उत्तरार्धात रंगली. आजही काही लालची पोलिसांच्या वृत्तीला सर्वसामान्य माणूस बळी पडत आहेत परंतू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत थँक्यू आणि सॉरी या दोन शब्दांमध्येच कसा अडकला आहे हे वास्तववादी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न लेखक आनंद म्हसवेकर यांनी या एकांकिकेमधून केला आहे. कट्ट्यावर सादर झालेली ही एकांकिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. म्हसवेकर लिखित आणि गणोश गायकवाड दिग्दर्शित या एकांकिकेमधील निलेश पाटील (डी. वाय. सावंत), शिवानी देशमुख(सुमन), आदित्य नाकती (पी.एस.आय. भोसले) यांच्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर संदीप पाटील (हवालदार पाटील) आणि योगेश मंडलिक (मि.कुलकर्णी) यांनी सहाय्यक भूमिकांमधून आपली कामिगरी चोख बजावली. सुरूवातीला प्रेक्षक प्रतिनिधी विजय चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पडले. यानंतर आपल्या सादरीकरणाच्या बळावर चौकार षटकार मारायला बालकलाकारांची फळी तयार होतीच. सानवी भोसले आणि पूर्वा तटकरे यांनी अनुक्रमे ‘दिवाळी’ व ‘माझी पहिली कविता’ या एकपात्री सादर केल्या. परिक्षेमधील कॉपी प्रकरणाचा कित्ता गिरवणारी ‘कॉपी’ ही एकपात्री चिन्मय मौर्य याने उत्तमरित्या वठवली तर त्याच धर्तीवर अखिलेश जाधव याने ‘प्रगती पुस्तक’ या एकपात्रीद्वारे धम्माल उडवली. प्रथम नाईकने ‘रेल्वे स्टेशन मास्तर’ तर वैष्णवी चेउलकर या चिमुकलीने ‘चल बेबी शाळेत जाऊ’ या एकपात्रीद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. मोठया गटातील हर्षदा शिंपी हिने ‘भान ठेवा’ या एकपात्रीद्वारे रसिकांच्या टाळ््या लुटल्या. कार्यक्र माच्या मध्यभागात वैभव चव्हाण याने ‘शेर ए गजल’ या मथळ््याअंतर्गत प्रेक्षकांसाठी काही हिंदी शायरिंचा नजराणा पेश केला. दरम्यान, कट्ट्याचे अध्यक्ष, दिग्दर्शक किरण नाकती यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत कट्ट्याच्या पुढील वाटचाली विषयी कल्पना दिली. कट्ट्याच्या निवेदनाची धुरा स्वप्नील काळे या कलाकाराने सांभाळली होती.