रेतीमाफियांवरील धडक कारवाईत साडेसहा कोटींचा मुद्देमाल नष्ट; मुंब्रा, कळवा, भिवंडीत छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:34 AM2020-01-14T00:34:44+5:302020-01-14T00:35:01+5:30
३२ सक्शनपंपांसह २५ बार्ज तोडल्या
ठाणे : अवैध वाळूउत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल विभागाने सोमवारी केलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे सहा कोटी ४८ लाखांचे साहित्य आणि रेतीसाठा जप्त करून नष्ट केल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. यात ३२ सक्शनपंप व २५ बार्ज गॅसकटरच्या साहाय्याने नष्ट केल्या. तर, ३३० ब्रास रेतीसाठा तसेच ५० ठिकाणी रेतीउपशासाठी उभारलेले हौद उद्ध्वस्त केले.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पारसिक, कळवा रेतीबंदर, काल्हेर रेतीबंदर, वडूनवघर, खारबाव, वेहळे, उल्हास नदी खाडीपात्र, टेंभा, तानसा या परिसरांतील खाडीकिनारी सक्शनपंपांच्या साहाय्याने अवैध रेतीउपसा मोठ्या प्रमाणावर होतो, अशा तक्र ारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळपासूनच ठाणे, कल्याण, भिवंडी आणि शहापूर तहसीलदारांनी धडक कारवाई केली. ठाणे तहसीलदार अधिक पाटील आणि त्यांच्या टीमने मुंब्रा पारसिक, कळवा रेतीबंदर आणि गणेशघाट परिसरात कारवाई करून आठ सक्शनपंप आणि आठ बार्ज जप्त करून नष्ट केले. भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड आणि त्यांच्या टीमने सकाळपासूनच कारवाईला सुरु वात करून नऊ सक्शनपंप व सहा बार्ज जप्त करून नष्ट केले. तसेच ३३० ब्रास रेतीसाठा जप्त केला.
कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि त्यांच्या टीमनेदेखील उल्हास नदी खाडीपात्रात प्रत्यक्ष उतरून अवैद्य रेतीउपशाविरोधात कारवाई केली. यावेळी कल्याण तालुका हद्दीतील खाडीपात्रातील ११ सक्शनपंप नष्ट करून नऊ बार्ज जप्त केल्या. तसेच २१ हौद उद्ध्वस्त केले. शहापूर तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने टेंभा व तानसा या दोन ठिकाणी नदीपात्रात कारवाई करून चार सक्शनपंप नष्ट केले. अंबरनाथ तहसीलदार जयराज देशमुख यांनी कारवाई करून दोन सक्शनपंप नष्ट केले.
मकोकांतर्गत करणार कारवाई
अवैध रेतीउपशाचा धंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चालतो. वारंवार कारवाई करुनही हे धंदे बंद होत नाहीत. बरेचदा कारवायांमध्ये तेचतेच आरोपी आढळतात. आरोपींची ही साखळी मोठी असून, त्यांना पायबंद घालण्यासाठी मकोकांतर्गत कारवाई करण्याचा इशारा महसूल यंत्रणेमार्फत देण्यात आला आहे.