ठाणे महापालिकेचे थकविले दीड कोटी; खड्डे बुजवणे महागात, छदामही दिली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 05:22 AM2019-12-06T05:22:40+5:302019-12-06T05:22:50+5:30
दरवर्षी पावसाळ्यात ठाण्यातील रस्त्यांना खड्डे पडतात. ते बुजविण्यासाठी महापालिका प्रत्येक प्रभाग समितीनिहाय २५ लाखांच्या निधीची तरतूद करते.
ठाणे : प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडले जातात. ते महापालिका बुजवत असली, तरी संबंधित रस्ते कोणत्या प्राधिकरणाचे आहेत, याचा विचार करीत नाही. मात्र, आता इतर प्राधिकरणाचे हे खड्डे बुजविणे पालिकेच्या अंगलट आले आहे. महापालिकेने मागील वर्षी एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविले होते. त्यासाठी एक कोटी ४० लाखांचा खर्चही केला होता. मात्र, चार वेळा पत्रव्यवहार करूनही यातील छदामही महापालिकेला मिळालेला नाही.
दरवर्षी पावसाळ्यात ठाण्यातील रस्त्यांना खड्डे पडतात. ते बुजविण्यासाठी महापालिका प्रत्येक प्रभाग समितीनिहाय २५ लाखांच्या निधीची तरतूद करते. इतर प्राधिकरणांचे रस्तेही पालिकेच्या माध्यमातून बुजविले जात असतात. परंतु, तरीही त्यांची परिस्थितीही जैसे थे दिसते. मागील वर्षीदेखील या रस्त्यांची चाळण झाली होती. त्यामुळे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ते कोणाचेही असोत, आधी ते बुजविण्यात यावेत, असे आदेश दिले होते. त्यानुसार, पालिकेच्या बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविले होते. यामध्ये घोडबंदर आणि तीनहातनाका, नितीन कंपनी आदी भागांतील एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांचे खड्डे बुजविले होते. एमएसआरडीसीच्या रस्त्यांच्या कामांसाठी ७५ लाखांचा आणि एमएमआरडीएच्या रस्त्यांवर ६५ लाख रुपये खर्च केले होते. हा खर्च मिळावा म्हणून महापालिकेने पत्रव्यवहार केला होता. मात्र, अद्यापही हा खर्च संबंधित प्राधिकरणांकडून मिळू शकलेला नाही.
चार वेळा पत्रव्यवहार
मागील वर्षीचा खर्च न मिळाल्याने पालिकेने यंदा या प्राधिकरणावरील रस्त्यांवरील खड्डे बुजविलेले नाहीत. त्यामुळे आजही घोडबंदरच्या उड्डाणपुलावर आणि तीनहातनाका पुलावर खड्डे आहेत. आता हा खर्च मिळावा म्हणून सलग चौथ्यांदा पत्रव्यवहार केल्याची माहिती नगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी दिली. तसेच वेळ पडल्यास स्वत: जाऊन पैसे मिळावेत म्हणून विनंती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.