दीडशेच्या सभागृहात ४०० मुख्याध्यापकांना ‘कोंडले’, शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:52 AM2018-03-29T00:52:37+5:302018-03-29T00:52:37+5:30
इयत्ता अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी ठाणे शिक्षण उपसंचालक कार्यालया
कल्याण : इयत्ता अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी ठाणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने बुधवारी पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयात घेतलेल्या कार्यशाळेत मुख्याध्यापकांची जागेअभावी चांगलीच परवड झाली. कार्यशाळा संपेपर्यंत बहुतांश मुख्याध्यापकांना उभे राहावे लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेनेही शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराचा निषेध केला आहे.
बिर्ला महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली. याप्रसंगी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर यासह जवळपासच्या शहरांमधून चारशेच्या आसपास मुख्याध्यापकांनी उपस्थिती लावली.
अकरावी आॅनलाइन प्रक्रिया कशी चालते, याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. साधारण सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या कार्यशाळेत मुख्याध्यापकांना हॉलमध्ये बसण्यासाठीही जागा नव्हती. त्यामुळे नंतर आलेल्या मुख्याध्यापकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. कार्यशाळा संपेपर्यंत अनेकांना हॉलच्या बाहेरच अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले. तर, काहींवर हॉलमध्ये जमिनीवर बसण्याची नामुश्की ओढवली. काही व्यासपीठावरही जाऊन उभे राहिले होते. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर पुढच्या वेळेस दोन विभागांत कार्यशाळा घेतली जाईल, असे सांगत आयोजकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
हॉलची क्षमता १५० ते २०० असताना या कार्यशाळेला चारशेच्या आसपास मुख्याध्यापकांनी हजेरी लावली होती. सोमवारी मुंबईत माटुंगा येथे पार पडलेल्या कार्यशाळेच्या दरम्यानदेखील ही समस्या उद्भवली होती. याची पुनरावृत्ती झाल्याचे बुधवारी कल्याणमध्ये पाहावयास मिळाले.