जिल्हा रुग्णालयात दीडशे बेडचे चिल्ड्रन हेल्थ सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:39+5:302021-07-21T04:26:39+5:30
ठाणे : ठाणे जिह्यात मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले. यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधित रुग्णांसह ...
ठाणे : ठाणे जिह्यात मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले. यात पहिल्या व दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात बाधित रुग्णांसह या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. त्यात आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. यात लहान मुलांवर जास्त परिणाम होणार असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन हेल्थ सेंटरची उभारणी केली असून, त्या ठिकाणी १५० बेड्स सज्ज ठेवले आहेत. यामध्ये २५ बेड्सचे पिडियाट्रिक अतिदक्षता विभाग असून, उर्वरित पिडियाट्रिक बेड्स असणार आहेत. तसेच यासाठी आवश्यक असलेले बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांचे पथकदेखील सज्ज ठेवले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर एप्रिल महिन्यात जिल्हा रुग्णालयाचे कोविड-१९ रुग्णालयात रूपांतर केले. त्या दिवसापासून आजतागायत जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. सुरुवातीपासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नेताजी मुळीक, डॉ. श्रुजित शिंदे, डॉ. विलास साळवे यांच्यासह डॉक्टरांचे व परिचारिका यांचे पथक अहोरात्र काम करून रुग्णांची सेवा बजावत आहे. त्यात पहिली व दुसऱ्या लाटेत बाधितांवर उपचार करताना आलेल्या अडचणी व समस्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या वेळी भेडसावू नये, यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यात तिसऱ्या लाटेत महिला-पुरुषांसह सर्वाधिक धोका बालकांना असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार जिल्हा मनोरुग्णालयाशेजारी असलेल्या जागेत डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन हेल्थ सेंटरची उभारणी केली आहे. या ठिकाणी बालकांवर उपचार करण्यासाठी लागणारी साधनसामग्री, औषधे, ऑक्सिजनचीही चोख व्यवस्था केली आहे.
.............
आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून, या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांचे समुपदेशन केले आहे. तसेच सहा बालरोगतज्ज्ञांचे पथक सज्ज असून, आवश्यक साधनसामग्री व इतर व्यवस्था केली आहे. - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे