ठाण्यात होणार दीड लाख बाप्पांचा जयजयकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:48 AM2021-09-10T04:48:37+5:302021-09-10T04:48:37+5:30
ठाणे : जिल्ह्याच्या विविध भागात १० सप्टेंबरला म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमारे दीड लाख बाप्पांच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना होणार ...
ठाणे : जिल्ह्याच्या विविध भागात १० सप्टेंबरला म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सुमारे दीड लाख बाप्पांच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये घरगुती एक लाख ४१ हजार २०, तर एक हजार ५८ सार्वजनिक बाप्पांचे वाजतगाजत तसेच गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया... या गजरात आगमन होणार आहे.
एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन शासनाने केले आहे. तसेच मिरवणूक आणि विसर्जनाला काहीसे निर्बंध घातले आहेत. ठाणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार त्या आयुक्तालयाच्या पाच परिमंडळात एकूण एक लाख ४२ हजार ७८ बाप्पांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये दीड दिवसांचे ३८ हजार ३७३, पाच दिवसांचे ४९ हजार ७८२, सात दिवसांचे १३ हजार ३१८, दहा दिवसांचे ३४ हजार ५६४, तर एकवीस दिवसांचे ८६ बाप्पा घरगुती आणि सार्वजनिक मंडळात त्या त्या दिवसांसाठी विराजमान होणार आहेत.
* उल्हासनगरात सर्वाधिक बाप्पा
उल्हासनगर शहरासह अंबरनाथ, बदलापूर या परिसरात सर्वाधिक सार्वजनिक आणि घरगुती श्रींचे आगमन होणार आहे. त्याखालोखाल कल्याण-डोंबिवली येतो. उल्हासनगरात सार्वजनिक २८२, तर घरगुती ४२ हजार ५८१ बाप्पांचे आगमन होणार आहे.
* गौरीमातांची संख्या १६ हजार
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात रविवारी १२ सप्टेंबरला १५ हजार ७१७ गौराई मातेचे आगमन होणार आहे. यामध्ये सर्वाधिक उल्हासनगर परिमंडळामध्ये आठ हजार ५६, त्याखालोखाल कल्याण- तीन हजार ३६४, वागळे इस्टेट - एक हजार ९१२, ठाणे शहर- एक हजार ८२५ आणि भिवंडीत ५६० गौराईंचा समावेश आहे.
* शहर पोलीस आयुक्तालयातील बाप्पा
परिमंडळ - सार्वजनिक - घरगुती
ठाणे शहर - १३६ - १९,६६५
भिवंडी - १५९ - १०,६६२
कल्याण - २७९- ४०,७३०
उल्हासनगर - २८२ - ४६,५८१
वागळे इस्टेट - २०२- २३,३८२
एकूण - १,०५८- १,४१,०२०